अटक न करण्यासाठी मागितली लाच; पुण्यात पोलीस उपनिरीक्षकासह वकीलावर गुन्हा दाखल
पुणे दि.24 निर्भीड वर्तमान:- फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये तपासात मदत व अटक न करण्यासाठी लाच घेतल्या प्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण व खाजगी व्यक्ती वकील राहुल फुलसुंदर यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील तक्रारदार यांच्या भावाविरुद्ध अलंकार पोलीस स्टेशन येथे जानेवारी २०२४ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता दाखल गुन्ह्याचा तपास अलंकार पो.स्टे.चे पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण हे करीत होते. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण यांनी तक्रारदार यांचेकडे गुन्ह्यात त्यांचे भावाला अटक न करण्यासाठी व गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी ५,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्याकडे सदर प्रकरणी तक्रार दिली होती. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी ला.प्र.वि. पुणे यांनी केली, व आरोपी पोलीस उपनिरीक्षक चव्हाण यांच्या करीता वकील राहुल फुलसुंदर यांनी तक्रारदार यांचेकडुन तडजोडीअंती ४०,०००/- (चाळीस हजार रुपये) लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे तर या दोघांही आरोपींना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले असुन अलंकार पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पुढील तपास ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे हे करीत आहेत.