अहमदनगर येथील खांडगे गावाचे तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- तक्रारदार यांनी दिनांक २०/०२/२०२३ रोजी त्यांचे नावावरील ४८ गुंठे जमीन विकली होती. विक्री केलेनंतर जमीनीची नोंद शासकीय अभिलेखात करुन देण्याची जबाबदारी तक्रारदार यांनी घेतली होती. त्यानुसार दि.२१/०२/२०२३ रोजी तक्रारदार यांनी दस्त व सुची २ हे आरोपी लोकसेवक रामेश्वर भागवत गोरे, तलाठी, वर्ग – ३, नेमणुक – सजा खांडके, ता. नगर, जि. अहमदनगर यांना देऊन खरेदी घेणारे व्यक्तीचे नावाची नोंद शासकीय अभिलेखात घेऊन फेरफार मिळणेकामी विनंती केली होती. त्यावेळी आरोपी लोकसेवक याने तक्रारदार यांचेकडे रुपये ५०००/- ची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहमदनगर यांचेकडे दि. २४/०२/२०२३ रोजी तक्रार केली.
सदर तक्रारीचे अनुषंगाने दि. २४/०२/२०२३ रोजी लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक रामेश्वर भागवत गोरे याने पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे रुपये ५०००/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झालेवरुन सुरभी हॉस्पिटल चौकात लाचेचा सापळा आयोजित केला असता आरोपी लोकसेवक गोरे याने तक्रारदार यांना लाचेची रक्कम फोन पे व्दारे त्याचे बॅक खातेवर टाकणेस सांगितले व ५००० /- रुपये त्याचे स्वतःचे खात्यावर आलेबाबत खात्री करुन तेथुन निघुन गेला. त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल वरुन आरोपी लोकसेवक यांचे मोबाईलवर फोन पे व्दारे पाठविलेले ५०००/- रुपये आरोपी लोकसेवक गोरे याचे खात्यावर वर्ग झाल्याची पंचासमक्ष खात्री करुन आरोपी लोकसेवक याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले आहे. सदर बाबत तोफखाना पोलीस स्टेशन, जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.