आरोग्यव्यवस्तेवर नैतिक दबाव टाकण्यासाठी रुग्ण हक्क परिषद महत्वपूर्ण काम करीत आहे – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
पुणे : सद्य परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर देखील लाखो रुपयांच्या बिलासाठी मृतदेह अडवून ठेवला जातो आणि संबंधित मृतदेहाचे बिल जर माफ केले गेले तर त्याचा खर्च धर्मादाय रुग्ण योजनेत दाखवण्यात येत आहे, अशावेळी रुग्णाला बिलच येणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करायला हवी. आरोग्यवस्थेतील चुकीच्या बाबीवर नेमकेपणाने बोट ठेवून आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठीची चळवळ उमेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेली रुग्ण हक्क परिषद ही संघटना महत्वपूर्ण काम करीत आहे, असे मत महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
यशोदीप पब्लिकेशन्स पुणे प्रकाशित हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे ? या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. यावेळी पुस्तकाचे लेखक उमेश चव्हाण, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रशेखर दैठणकर, डॉ. अमोल देवळेकर, माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे आणि मिलिंद गायकवाड उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, सध्याच्या सरकारला निवडून येण्याची खात्री नसल्यामुळेच त्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. इतर कोणत्याही खात्यांना निधी शिल्लक नसून, सर्व पैसा लाडकी बहीण योजनेसाठी वापरत असल्यामुळे राज्याच्या अर्थमंत्री आणि कृषिमंत्री यांच्यात भांडणे झाली आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तीन महिनेच योजनेचे पैसे महिला लाभार्थ्यांना मिळतील इतकीच तरतूद त्यांनी केलेली आहे.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, आरोग्यमंत्र्याचा फोटो छापून सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीचा खर्च जरी थेट रुग्णांच्या मदतीसाठी वापरला तरी आरोग्यवस्था सुधारण्यास चालना मिळेल.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे इतका द्वेष निर्माण झालेला आहे. द्वेषाची लागण साथीच्या रोगाप्रमाणे पसरत आहे. पुणे मनपाची आरोग्य व्यवस्था कमालीची बिघडली आहे. आणि देशात लोकांचे भले करणारे राजकारण व्हायला हवे. रुग्ण हक्क परिषदही संघटना अत्यंत महत्त्वपूर्ण काम करीत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस म्हणाले की, हॉस्पिटलचे बिल माफ कसे करावे? हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मोफत उपचारांच्या योजनांचा समावेश शालेय महाविद्यालयीन अभ्यासक्रमात व्हायला हवा.
यावेळी चंद्रशेखर दैठणकर, भानुप्रताप बर्गे, मिलिंद गायकवाड यांची भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष संजय आल्हाट, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कदम, आशिष गांधी, इक्बाल शेख, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे, प्रकाशक निखिल लंभाते, रुग्ण हक्क परिषदेच्या शहराध्यक्ष अपर्णा मारणे- साठे यावेळी विशेष उपस्थित होते.
यशोदीप पब्लिकेशन्सच्या रूपाली अवचरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर माजी सहाय्यक पोलीस आयुक्त जान महंमद पठाण यांनी आभार मानले.