एचडीएफसी बँकेच्या दोन अधिकाऱ्यांना लाचखोरी प्रकरणात तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- लाचखोरी प्रकरणी दोषी ठरलेल्या (HDFC) एचडीएफसी बँक लिमिटेड, बारामती शाखेच्या एका माजी ग्राहक सेवा अधिकाऱ्याला (किरकोळ कृषी), पुणे सीबीआय न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी, तीन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा आणि 60,000/- रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच ह्याच बँकेच्या बारामती तील जलोची शाखेच्या ग्रामीण विपणन अधिकाऱ्याला 3 वर्षांचा सश्रम कारावास आणि 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणी आलेल्या तक्रारीवरून सीबीआयने 30 जुलै 2020 रोजी माजी ग्राहक सेवा अधिकाऱ्याविरुद्ध (रिलेशनशिप मॅनेजर) गुन्हा दाखल केला होता. आरोपीने, एचडीएफसी बँकेचे 99 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यासाठी 2,70,000/- रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारदाराने केला होता. नंतर या लाचेच्या रकमेबद्दल वाटाघाटी होऊन, 2.25 रुपयांची रक्कम निश्चित करण्यात आली. त्यापैकी, 2 लाख रुपये सुरवातीला दिले गेले. या अधिकाऱ्याने आपले कनिष्ट सहकारी, जे बँकेत रूरल सेल्स अधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यांना ही लाचेची रक्कम घेण्यासाठी तक्रारदाराकडे पाठवले.
त्यावेळी सीबीआयने सापळा रचून या कर्मचाऱ्याला तक्रारदाराकडून 2 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले. त्यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींच्या परिसरात झडती घेऊन काही अवैध कागदपत्रेही जप्त करण्यात आली.
तपासानंतर, सीबीआयने दोन्ही आरोपींविरुद्ध 18 डिसेंबर 2020 रोजी पुण्याच्या सीबीआय विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.