ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- ऑस्ट्रियाच्या भारतातील राजदूत कॅथरीना विझर यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रियाच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली.
रस्त्यांच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवोन्मेष आणि पर्यावरण पूरक (हरित) तंत्रज्ञान यावर या बैठकीत विचारांचे आदान प्रदान करण्यात आले. ऑस्ट्रियन कंपन्यांच्या प्रतिनिधींनी विविध नवोन्मेषी तंत्रज्ञान आणि त्यांच्याद्वारे तयार केलेल्या केलेल्या नवोन्मेषी उत्पादनांची केंद्रीय मंत्री गडकरी यांना माहिती दिली. भारत अनेक रोपवे आणि केबल कार प्रकल्प राबवत असल्याची माहिती गडकरी यांनी दिली. ऑस्ट्रियन कंपन्या बनवत असलेले रोपवे आणि केबल कारचे घटक आणि उपकरणांच्या उच्च गुणवत्तेचे त्यांनी कौतुक केले, आणि तंत्रज्ञान हस्तांतरण आणि त्याचे भारतात उत्पादन करण्यासाठी सहकार्य करण्यावर भर दिला. उत्पादनाचा एकूण खर्च कमी करण्यासाठी, या कंपन्यांनी भारतात उत्पादन प्रकल्प उभारावेत असे आवाहन त्यांनी केले.
महामार्ग बांधणी, बोगद्याचे बांधकाम, इलेक्ट्रॉनिक पथकर प्रणाली, इंटेलिजेंट वाहतूक यंत्रणा, वाहतूक व्यवस्थापन प्रणाली, हरित तंत्रज्ञान, बोगदा निरीक्षण प्रणाली आणि रस्ते सुरक्षा यामधील नवीन तंत्रज्ञान, यासारख्या परस्पर सहकार्याच्या संभाव्य क्षेत्रांवरही यावेळी चर्चा झाली.
रस्ते वाहतूक क्षेत्रात नवोन्मेष आणण्यासाठी आणि वाहतूक आणि पुरवठा साखळीमधील समकालीन आव्हानांवर प्रभावी उपाय विकसित करण्यासाठी, ऑस्ट्रियाबरोबरची भारताची भागीदारी आणि विकासात्मक सहकार्य बळकट करण्याचा मार्ग या बैठकीत प्रशस्त झाला. ऑस्ट्रियाच्या राजदूत कॅथरीना विझर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना ऑस्ट्रिया भेटीसाठी निमंत्रितही केले आहे.