कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया घेणार किर्गिस्तान आणि हंगेरी येथे प्रशिक्षण..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- भारतीय कुस्तीपटू आणि टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजनेतील (TOPS) खेळाडू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया जुलैच्या पहिल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरांसाठी किर्गिस्तान आणि हंगेरीला जाणार आहेत.
त्यांनी आपले प्रस्ताव युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय टॉप्स टीमकडे पाठवले होते आणि त्यांनी विनंती केल्यापासून 24 तासांच्या आत ते मंजूरही करण्यात आले आहेत.
ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया 36 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी किर्गिझस्तानमधील इस्सिक-कुल येथे रवाना होईल, तर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदक विजेती विनेश फोगट प्रथम किर्गिझस्तानमधील बिश्केक इथे एका आठवड्याच्या प्रशिक्षणासाठी त्यानंतर हंगेरीत टाटा येथे 18 दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी रवाना होईल.
विनेशबरोबर फिजिओथेरपिस्ट अश्विनी जीवन पाटील, सरावातील भागीदार संगीता फोगट आणि प्रशिक्षक सुदेश, बजरंगसोबत प्रशिक्षक सुजीत मान, फिजिओथेरपिस्ट अनुज गुप्ता, सरावातील भागीदार जितेंद्र आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग तज्ज्ञ काझी हसन असतील.
विनेश, बजरंग, आणि त्यांचे सरावातील भागीदार संगीता फोगट आणि जितेंद्र, प्रशिक्षक सुदेश आणि सुजीत मान यांचे विमानाचे तिकीट, जेवणाचा आणि राहण्याचा खर्च, शिबिराचा खर्च, विमानतळ बदलण्याचा खर्च, ओपीए आणि इतर किरकोळ खर्च केंद्र सरकार उचलणार आहे.
याव्यतिरिक्त, कुस्तीपटूंसोबत असलेल्या इतर सहाय्यक स्टाफच्या कर्मचाऱ्यांच्या खर्चाचा भार ऑलिंपिक गोल्ड क्वेस्ट करणार आहे.