आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशपुणे

खडकीच्या लष्करी रुग्णालयात ‘जागतिक स्पाइनल कॉर्ड इंज्युरी डे’ निमित्त अपंगत्वावर मात केलेल्या सैनिकांचा केला गौरव

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- खडकीच्या लष्करी रुग्णालयात असलेल्या स्पाइनल कॉर्ड इंज्युरी केंद्रात आंतरराष्ट्रीय स्पाइनल कॉर्ड इंज्युरी डे (पाठीचा कणा दुखापत विषयक दिवस) 2023 (05 सप्टेंबर 2023) रोजी साजरा करण्यात आला. यावेळी ज्या सैनिकांनी अपंगत्वावर मात केली आहे आणि आंतरराष्ट्रीय पॅरा-ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत त्यांच्या कामगिरीचा गौरव यावेळी करण्यात आला. यावेळी लेफ्टनंट कर्नल साहिल गौतम आणि हवालदार गोपाल सिंह यांनी कथन केलेल्या मानवाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या कहाण्यानी यावेळी आपल्या कुटुंबासह उपस्थित जवळजवळ 200 पॅराप्लेजिक्स (पक्षाघात झालेले), क्वाड्रिप्लेजिक्स (हातापायांना पक्षाघात झालेले) आणि टेट्राप्लेजिक( दोन्ही हात पायांना पक्षाघात झालेले) मंत्रमुग्ध झाले. अंथरुणाला खिळवणाऱ्या असहाय्य्यतेवर मात करत पॅरा-खेळाडू बनून मोठी कामगिरी करण्यापर्यंत या जवानांच्या संघर्ष गाथांनी उपस्थित भारावून गेले होते. पॅराप्लेजिक रिहॅब सेंटरच्या रहिवाशांनी एक संगीतमय कार्यक्रम देखील आयोजित केला होता.

एक यशस्वी कार्डिओथोरॅसिक सर्जन आणि एक प्रसिद्ध टेड (TED) वक्ते डॉ सुरप्रीत चोप्रा यांनी निराशा आणि दुखापतीतून फिनिक्ससारखी कशी झेप घ्यायची आणि जिद्दीने उद्दिष्ट कशाप्रकारे मिळवायचे यावर भाषण दिले. दक्षिण कमांडचे वैद्यकीय मेजर जनरल हृदेश साहनी यांनी रूग्णांना मार्गदर्शन केले आणि जीवनाचा नवा अर्थ शोधण्‍यासाठी घडून गेलेल्या गोष्टी मागे सारण्यावर त्यांनी भर दिला. रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांनी केलेल्या कथा, कविता आणि कलाकृतींचे संकलन असलेल्या  ‘सक्षम’ची दुसरी आवृत्तीही प्रसिद्ध करण्यात आली.

सन्माननीय पाहुणे, संजय रामचंद्र कदम, उपायुक्त, अपंग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र शासन यांनी यावेळी पाठीच्या कण्याला दुखापत झालेल्या सर्व रूग्णांचे त्यांच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल अभिनंदन केले आणि दिव्यांग व्यक्तींसाठी अधिक जागरूकता मोहिमेच्या गरजेवर आणि समाजातील सर्वसमावेशकतेवर भर दिला.

समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवसाच्या निमित्ताने संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्र आणि एमएच खडकीच्या पक्षाघात झालेल्या सैनिकांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी तोंडाने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. पक्षाघात झालेल्या रुग्णांसाठी नृत्योपचार’ हा नृत्य उपचाराचा एक अनोखा कार्यक्रम   सुचित्रा दाते यांच्या प्रख्यात नृत्यसमूहाने सादर केला. या दिवसाच्या पूर्वसंध्येला व्हीलचेअर बास्केटबॉल सामना देखील आयोजित करण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!