ग्रामसेविका व सरपंच लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- तक्रारदार हे ग्रामपंचायत बलायदुरी येथे शिपाई म्हणून नेमणुकीस होते. ते जून २०२० मध्ये सेवानिवृत्त झाले असून त्यांचे बलायदुरी ग्रामपंचायत येथे १६४,६८२/- रुपये राहणीमान भत्ता बिलाची रक्कम मिळणे बाकी होती. आपल्याच राहणीमान भत्त्याच्या रक्कमेचा धनादेश बनवून देण्यासाठी आशा देवराम गोडसे, ग्रामसेविका, बलायदुरी ग्रामपंचायत यांनी व हिरामण पांडुरंग दुभाषे, सरपंच बलायदुरी ग्रामपंचायत, ता. इगतपुरी, जि. नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रूपये लाचेची मागणी करत होते तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालय यांच्याकडे केली.
मिळालेल्या तक्रारीवरुन ला. प्र. वि. नाशिक पथकाने पडताळणी करून सापळा आयोजित केला असता सापळा कारवाई दरम्यान आरोपी सरपंच हिरामण पांडुरंग दुभाषे व आरोपी मल्हारी पंढरीनाथ गटकळ, खाजगी इसम यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रूपये लाचेची मागणी केली व लाचेची रक्कम देण्यासाठी आशा देवराम गोडसे, ग्रामसेविका, बलायदुरी ग्रामपंचायत, ता. इगतपुरी, जि. नाशिक, यांनी प्रोत्साहन दिले हे स्पष्ट झाले, मागणी केलेली लाचेची रक्कम दि.७.२.२०२३ रोजी घोटी येथील जुना मुंबई- आग्रारोड वरील आर. के. टायर सर्व्हिस दुकानासमोर तक्रारदार यांचेकडून स्विकारल्याने त्यांना पकडण्यात आले असून तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अ १२ प्रमाणे गुन्हा नोंदविण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.