ग्रेटर नोएडा येथून अंमली पदार्थ तस्करी टोळीचा प्रमुख सदस्याला अटक
मुंबई दि. 19 ( निर्भीड वर्तमान ):- अंमली पदार्थ तस्करीचा छडा लावण्यात उल्लेखनीय यश मिळाले असून महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी ग्रेटर नोएडा येथून कार्यरत अंमली पदार्थ तस्करी टोळीचा प्रमुख सदस्य असलेल्या नायजेरियन नागरिकाला अटक केली आहे.
डीआरआय ने यापूर्वी 14.10.2023 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून 2.485 किलो कोकेन जप्त केले होते आणि या टोळीसाठी भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करताना एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले होते. या प्रकरणी अधिक सखोल तपासादरम्यान, तस्करी करणाऱ्या या टोळीच्या प्रमुख सदस्याची माहिती मिळाली , जो ग्रेटर नोएडामधून या टोळीला वित्तपुरवठा करून टोळी चालवत होता. दोन महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर आणि पाळत ठेवल्यानंतर अधिकाऱ्यांना आरोपीचा ठावठिकाणा शोधण्यात यश आले.
त्यानंतर मुंबई आणि नोएडा येथील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या डीआरआयच्या पथकाने सापळा रचून तस्करी करणाऱ्या या टोळीच्या प्रमुख सदस्याला उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोठ्या संख्येने सिमकार्ड, मोबाईल फोन आणि विविध देशातून जारी केलेले अनेक पासपोर्ट सापडले. त्यानंतर, त्याला अटक करण्यात आली आणि ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात आले आहे.