चाकण पोलीस स्टेशन येथील पोलीस शिपाई व खाजगी इसमावर लाच मागणी प्रकरणी कारवाई..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा : – पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोक्सो गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी दहा हजार रुपये लाच घेताना चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई आणि खासगी व्यक्तीला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. पोलीस शिपाई संतोष सुरेश पंदरकर खाजगी इसम किसन आंद्रे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई सोमवारी (दि.19) केली.
याबाबत 32 वर्षीय व्यक्तीने पुणे एसबीकडे तक्रार केली आहे. चाकण पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस शिपाई संतोष पंदरकर यांनी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबीकडे 3 डिसेंबर रोजी तक्रार केली.
पथकाने पडताळणी केली असता, पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पोस्को गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी पोलीस शिपाई पंदरकर यांनी दहा हजार रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सोमवारी सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची दहा हजार रुपये रक्कम स्विकाराताना खासगी इसम किसन आंद्रे याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर पोलीस शिपाई संतोष पंदरकर याला ताब्यात घेतले.
दोघांवर चाकण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे करीत आहेत.