छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जलमंदिर पॅलेसला मुख्यमंत्र्यांची भेट
सातारा, निर्भीड वर्तमान:- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त सातारा येथील त्यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिष्टचिंतन केले आहे. यावेळी त्यांना शाल पुष्पगुच्छ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनावर बसलेली मूर्ती भेट म्हणून दिली.
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी खासदार म्हणून कायमच लोकांमध्ये मिसळून त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात ते कायम अग्रणी राहिले. विशेष म्हणजे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्यानंतर आमची पहिलीच भेट असल्याने त्याला एक वेगळे महत्त्व आहे. सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांसाठी शासनाने ३८१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी दिली असून त्यातील प्रतापगड संवर्धनाच्या कामाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवत असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, राजमाता कल्पनाराजे भोसले तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.