ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा मा.शरद पवार यांच्या भाषणात उजाळा

मुंबई, निर्भीड वर्तमान:- संविधान हक्क परिषद आणि शिक्षणाचे खाजगीकरण या दोन गोष्टींसाठी उल्हासनगर येथील दसरा मैदानावर आयोजित कार्यक्रमात मा. शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते.

उपस्थितांना संबोधित करत मा.शरद पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, सबंध देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये कष्टकरी माणूस अस्वस्थ आहे, भवितव्याच्या संबंधीची त्याला चिंता आहे. या सामान्य माणसातल्या आयुष्याची जाण निशाताई आणि इथले सहकारी करत असतात ही या देशाच्या दृष्टीने ही अतिशय महत्त्वाची बाब आहे.

संविधान म्हणजे नक्की काय ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तुम्हाला आणि मला जो मूलभूत अधिकार दिला तो अधिकार नसता, तर आजूबाजूच्या देशांमध्ये गेल्या काही वर्षात काय घडलं याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्रीलंकेमध्ये हुकूमशाही आली, राज्य गेलं आणि पुन्हा एकदा लोकशाहीकडे यायला त्या देशाला काही वर्ष लागली. काल पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्या. सरकार बदलेल की नाही याची खात्री नाही, याच्या आधीच्या काळामध्ये लष्कराने सत्ता हातात घेतली. संविधानाचा आणि लोकशाहीचा मुडदा पाडायचं काम पाकिस्तानमध्ये झाला. कालच्या निवडणुकीमध्ये जाहीर करण्यात आलं की, १०० खासदार निवडून आले ते कोणत्याही पक्षाचे नाहीत आणि नंबर दोनला जे निर्वाचित झालेले त्यांच्या हातात सत्ता जाण्याची शक्यता आहे आणि, कारण लष्कराची मदत त्यांना आहे.

कुठे गेली लोकशाही ? कुठे गेलं संविधान ? आज ते चित्र शेजारच्या पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहे. बांग्लादेशमध्ये देखील तेच झाले. राज्यकर्त्यांची हत्या झाली आणि अनेक वर्ष बांग्लादेशमध्ये हुकूमशाहीचे राज्य होते. ही स्थिती येऊ द्यायची नसेल, तर मूलभूत अधिकार देणारी घटना ही जपली पाहिजे आणि आपण भाग्यवान आहोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे दूरदृष्टी असलेला महामानव या देशामध्ये जन्माला आला आणि लोकांचा हा अधिकार अखंड जतन करण्यासाठी त्यांनी एक नवीन रस्ता आपल्याला दिला.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतल्यानंतर आपण नेहमी घटनेचा उल्लेख करतो. बाबासाहेबांनी हा देश उभा करण्यासाठी स्वातंत्र्याच्या आधीच्या काळात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. १९४७ ला आपण स्वातंत्र्य झालो, पण त्याआधी एकदा स्थानिक लोकांचे सरकार बनवायला इंग्रजांनी संमती दिली. त्यात जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे अनेक मान्यवर लोक होते. त्यावेळी, स्वातंत्र्य मिळाले नव्हते. त्या काळात बाबासाहेबांकडे जल आणि विद्युत हे दोन खाती होती. त्याबरोबरच, कामगार यासंबंधीचे खाते होते. हे घडलं कधी, १९४७ च्या आधी. काय केलं बाबासाहेबांनी, तर आपल्या हातामध्ये जल खाते होते. पाणी आणि त्याचे महत्त्व हे त्यांनी ओळखले. आणि थेंब न् थेंब कसा वाचवता येईल याची काळजी घेतली. यासाठी पंजाबमध्ये भाकरा नांगल सारखे धरण असेल, की जे धरण बांधायची आवश्यकता का आहे याचे महत्त्व बाबासाहेबांनी त्या काळात सांगितले आणि ते धरण बांधले. आज पंजाब, हरियाणा, आणि उत्तर प्रदेशचा काही भाग येथील ९० ते ९५% शेती ही बागायती झाली. या देशाच्या भुकेचा प्रश्न तिथल्या शेतकऱ्यांनी सोडवला, त्याच्या पाठीमागील दृष्टी ही बाबासाहेबांची होती.

नुसता धरणाचा विचार न करता वीज कशी करता येईल याचा विचार बाबासाहेबांनी केला. नुसती वीज काढून चालणार नाही, ती वीज ज्या राज्यात नसेल त्या ठिकाणी नेण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये वीज मंडळ तयार करणे आणि विजेची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र लाईन टाकणे हा विचार बाबासाहेबांनी मांडला. त्याचा परिणाम आज हे सगळे दिवे ठिकठिकाणी दिसतात. त्यामागील दृष्टी ही बाबासाहेबांची होती.

मुलभूत प्रश्न सोडवण्याचा निकाल त्यांनी घेतला. आणखी महत्वाचे काम त्यांनी केले ते म्हणजे कष्ट करणाऱ्या कामगाराला अधिकार असला पाहिजे. चळवळी झाल्या, कामगार चळवळ ही अनेक ठिकाणी पाहिली. एक काळ असा होता की, मुंबई शहरामध्ये गिरणी कामगारांनी संप केला, राज्य अडचणीत आलं. आपण बघितलं आपल्या आजूबाजूला अनेक कामगार संघटनांनी शक्ती एकत्रित केली व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. हा त्यांचा कष्टकऱ्यांचा अधिकार बाबासाहेबांनी त्यांना दिला. त्यामुळे दृष्टी असलेला हा नेता हा फक्त विचार मांडून थांबला नाही, तर त्या विचाराला कायमचा अधिकार मिळाला पाहिजे. तो करायचा असेल, तर दृष्टी असलेली आणि मजबूत संविधानाची गरज आहे, या हेतूने डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची निर्मिती केली. आज ते संविधान धोक्यात आले आहे, याची चिंता नागरिकांच्या मनात व्हायला लागली आहे. अधिकार जे संविधानाने दिले, त्या अधिकारांवर हल्ले व्हायला लागले. त्या हल्ल्यांमागे बाबासाहेबांनी दिलेली घटना दुबळी करण्याचा प्रयत्न आहे व ते काम आज मोदी व त्यांचे सर्व सहकारी करत आहेत.

शेतकऱ्यांवर हल्ले होत आहेत, एक-एक वर्ष दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकरी येऊन बसतात. एक वर्ष घरदार सोडून त्या ठिकाणी ऊन्हा-तान्हाचा, थंडीचा विचार न करता त्याठिकाणी बसतात. त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेचा वापर हा केला पाहिजे, ही भूमिका आजच्या राज्यकर्त्यांच्या मनात नाही. त्याचे महत्वाचे कारण की, हे संविधान हा जो मूलभूत अधिकार जो सामान्य लोकांचा आहे, मग तो शेतकरी असेल, कष्टकरी कामगार असेल किंवा आणखी कुणी उपेक्षित असेल त्याबद्दलची आस्था आजच्या राज्यकर्त्यांमध्ये नाही. त्यामुळे, जर आपण जागृत राहिलो नाही, तर उद्याच्याला या संविधानाला एक प्रकारचा धक्का हा लागल्याशिवाय राहणार नाही.

शिक्षण हा तुमचा मुलभूत अधिकार आहे तो सावित्रीबाई फुले व शाहू महाराजांनी दिला, महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिला. घटना बनवताना हा अधिकार दिला पाहिजे ही भूमिका बाबासाहेबांनी सतत मनात ठेवली, आज त्याचे सार्वत्रिकरण केले जात आहे. एका बाजूने संविधानावर हल्ला, दुसऱ्या बाजूने शिक्षणाचा जो मुलभूत अधिकार आहे, त्याच्यावर हल्ला ही सगळी संकटाची स्थिती आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात.

आताच आपल्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांनी एक उल्लेख केला, पुण्यात काही लोक एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की ‘निर्भय बनो’..! भीती काढून टाका, मूलभूत अधिकारांसाठी संघर्ष करा, शांततेच्या मार्गाने करा, निर्भयतेने करा. ‘निर्भय बनो, भीती घालवा’ हे सांगितलं गेलं, त्याची मांडणी केली तर त्याच्यावर हल्ले होतात. गाड्यांच्या काचा फोडल्या जातात, लोक जखमी केले जातात, मुलींवर हल्ला केला जातो. हे पुण्यासारख्या ठिकाणी काल-परवा घडलं. याचा स्वच्छ अर्थ आहे की, हे लोक सत्तेचा गैरवापर करून याप्रकारे मूलभूत अधिकार उद्ध्वस्त करायला निघालेत, त्यासाठी तुम्हाला आणि मला जागरूक राहायची एक प्रकारची ऐतिहासिक जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आहे, ती करण्यासाठी आपण सर्वजण तयार राहू एवढेच या ठिकाणी सांगतो. हा अत्यंत महत्वाचा विचार जनमानसामध्ये रुजवण्याच्या दृष्टीने हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्याला लाख लाख धन्यवाद देतो आणि माझे शब्द थांबवतो.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!