आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धाराशिव येथे ५०० बेड्सचे होणार सुसज्ज रुग्णालय

मुंबई निर्भीड वर्तमान:- धाराशिव जिल्ह्यात 500 बेडसचे अद्ययावत जिल्हा रुग्णालय उभारण्याची कार्यवाही तात्काळ करण्याच्या सूचनाही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. आशियाई विकास बँकेने गेली काही वर्ष प्रलंबित ४ हजार कोटींचे कर्ज मंजूर केले असून त्यातून राज्यातील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 1200 कोटी रुपये तत्वत: उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे,

राज्य सरकारने आशियाई विकास बँकेने दिलेल्या सूचनांप्रमाणे राज्य शासनाने प्रशासकीय सुधारणा केल्यामुळे हे प्रलंबित कर्ज मंजूर झाल्याचे प्रारंभी मित्रा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांनी सांगितले. आशियाई विकास बँकेच्या या कर्जातून राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचे तसेच आरोग्याच्या तृतीयक सेवेचे (Tertiary Care) बळकटीकरण होणार आहे.

सुधारणांमुळे कर्ज मंजुरीचा मार्ग मोकळा

आशियाई विकास बँकेने इतके मोठे कर्ज मंजूर करण्यापूर्वी सात प्रशासकीय व शैक्षणिक सुधारणा सुचवल्या होत्या. यासंदर्भात सध्याच्या राज्य शासनाने वेगाने पाऊले उचलल्यामुळे कर्ज मंजुरी शक्य झाली असे बँकेचे टीम लीडर डॉ निशांत जैन यांनी सांगितले आहे. यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स, डिजिटल मेडिकल एज्युकेशन आणि हेल्थ पॉलिसी तसेच ई हॉस्पिटल, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन, मालमत्ता नियोजन , व्यवस्थापन आणि शाश्वतता धोरण, उमेदवार भरती कक्ष, औषध खरेदी अधिकाराचे विकेंद्रीकरण अशा सुधारणा शासनाने केल्या.

धाराशिव येथे सुसज्ज रुग्णालय उभारा

१५० मिलियन डॉलर्स म्हणजेच १२०० कोटी रुपये प्रकल्पाशी संबंधित बांधकामे, धोरणात्मक बाबींसाठी बँकेकडून देण्यात येणार असून ३५० डॉलर्स म्हणजेच २८०० कोटी रुपये बांधकाम आणि यंत्रसामुग्रीसाठी दिले जातील. सध्या अलिबाग येथे बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसाठी निविदा प्रक्रिया सुरु आहे.

आज आशियाई विकास बँकेने १२०० कोटींची तत्वत: मान्यता दिली. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असल्याने याठिकाणी ५०० बेड्सचे सुसज्ज जिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी तातडीने निविदा प्रक्रिया राबवावी व कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बैठकीदरम्यान  दिले आहेत. परभणी येथे देखील जिल्हा रुग्णालय उभारण्याचे विचाराधीन आहेत तर धाराशिव येथे जिल्हा रुग्णालय उभारण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी लगेचच जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

आरोग्यमंत्र्यांकडून समाधान

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी समाधान व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभर मानले आहेत. ते म्हणाले आहेत की, या सुसज्ज रुग्णालयामुळे या भागातील व नजीकच्या जिल्ह्यातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मोठा लाभ होईल. आकांक्षित जिल्हा असल्याने धाराशिवला अशा प्रकारच्या चांगल्या आरोग्य प्रकल्पाची गरज होतीच असेही ते म्हणाले.

यावेळी मुख्य सचिव डॉ नितीन करीर, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि आयुक्तालयाचे अधिकारी तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील सचिव व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!