नागपूर विभागातील राज्य शासकीय कर्मचाऱ्यांकरिता इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर्सची सुविधा आजपासून होणार उपलब्ध
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- नागपूर क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण वृद्धी करिता प्रधान महालेखापाल कार्यालय नागपुर यांच्याव्दारे इलेक्ट्रॉनिक पेन्शन पेमेंट ऑर्डर्स – ई-पीपीओ जारी करण्यात येणार असून एक पथदर्शी प्रकल्प म्हणून 1 डिसेंबर 2023 पासून नागपुर जिल्ह्यातील सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱयांना ई-पीपीओ पाठविले जातील. पेन्शनर्सला अनुकूल असणाऱ्या या डिजीटील पुढाकाराचा शुभारंभ जया भगत, प्रधान महालेखापाल यांचे हस्ते आज 23 नोव्हेंबर गुरुवार दुपारी 4 वाजता प्रधान महालेखापाल नागपुर कार्यालय येथे होणार आहे. ईपीपीओ या उपक्रमाव्दारे कोषागार अधिकाऱयांद्वारे पेन्शनचे वितरण सुव्यवस्थित व गतीने होण्याची अपेक्षा आहे.
सध्या पेन्शन प्रकरणे निकाली काढल्यानंतर अनेक पानांची व अनेक घड्यांची छपाईपूर्व लेखनसामुग्री पीपीओ छपाई करिता वापरात येत असते. ह्या पीपीओचे प्राधिकार पत्र सक्षम अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी नंतर प्रधान महालेखापाल कार्यालयाद्वारे शीघ्र डाकेने पाठविले जातात. बऱ्याच वेळा पीपीओ प्राधिकार पत्रे प्रधान महालेखापाल कार्यालयाने पाठविल्या नंतर 10 ते 15 दिवसानंतर पेन्शनर, कोषागार अधिकारी व आहरण व संवितरण अधिकाऱयांना प्राप्त होतात.पेन्शनर्सला उत्तम सेवा प्रदान करण्याच्या लोकसेवा प्रयत्नाचा एक भाग म्हणून प्रधान महालेखापाल कार्यालयाद्वारे एक पारदर्शक, सुरक्षित आणि वापरकर्त्यास अनुकूल असे माध्यम म्हणजे ई-पीपीओ या सुविधेचा समावेश करण्यात आला आहे. आता अशी प्राधिकार पत्रे सर्व भागधारकांना त्याच दिवशी प्राप्त होतील ज्या दिवशी प्राधिकार पत्रे अंतिम होतील आणि पेन्शनरला केव्हाही व कुठूनही सहज उपलब्ध होतील.
डिजिटल पीपीओ,जलदगती प्रक्रिया व तात्काळ वितरण,एस एम एस द्वारे पेन्शनर ला सूचनेद्वारे तात्काळ माहिती,महाराष्ट्र शासनाच्या “महाकोष” संकेतस्थळावर ई-पीपीओची सहज उपलब्धता ही या ई-पीपीओची वैशिष्ट्ये आहेत.
नागपूर क्षेत्रातील अन्य जिल्हे, अमरावती व औरंगाबाद क्षेत्रातील जिल्हे येथून सेवानिवृत्त होणाऱ्या महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱयांना सुद्धा ई-पी पी ओ पाठविण्याचा संकल्पही प्रधान महालेखापाल – II , नागपुर या कार्यालयाने केला आहे.
सेवानिवृत्त शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समाधानासाठी ‘पेंशन समाधान एक डिजीटल विंडो’ चेही सकाळी 11.30 वाजता प्रधान महालेखाकार कार्यालयातील सभागृहात उद्घाटन होणार आहे.
प्रधान महालेखाकार कार्यालयाच्या वतीने ‘पेंशन आपल्यादारी’ हा कार्यक्रम विदर्भ व मराठवाडा विभागात आपल्या अधिकार क्षेत्रात वरीष्ठ नागरिकांसाठी पेंशन संबंधित डिजिटल उपक्रम सुरु केला आहे. या नवीन अभिनव कार्याक्रमात पेंशनधाकरकांना अनुकूल विकल्पासह योजनेत सहभागी करण्यात येणार आहे. या उपक्रमाद्वारे महालेखाकार कार्यालयाचे अधिकारी विडियो कॉलद्वारे पेंशनधारकांच्या घरी जातील व त्यांच्या पेंशन विषयी समस्या जाणून घेतील.पेंशन समाधान योजनेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज किंवा पीएजी कार्यालय टोल फ्री क्रमाक 1882337834 या इंटरकॉम फोनकॉलच्या माध्यमातून नोंदणी करता येईल.