आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना मिळणार न्यूयॉर्कच्या बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेजची शिष्यवृत्ती

मुंबई, दि. १८ निर्भीड वर्तमान:- न्यूयॉर्क येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाने सन २०२४ मध्ये महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना इयत्ता बारावी नंतरच्या पदवी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले आहे.

या शिष्यवृत्तीमुळे महाराष्ट्रातील दहा विद्यार्थिनींना उच्च आणि व्यावसायिक शिक्षणासाठी न्यूयॉर्क स्थित या महाविद्यालयात प्रवेश मिळणार आहे. या शिष्यवृत्तीच्या रूपाने राज्यातील विद्यार्थिनींना आंतरराष्ट्रीय शिक्षणाची कवाडे खुली होणार आहेत, असे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. तसेच अशाच प्रकारची संधी जर्मनी मधील शैक्षणिक संस्थेतही उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. महिलांचे सबलीकरण व्हावे, त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी तसेच आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात खंड पडू नये यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जात आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील पत्रकार कक्षात पालकमंत्री श्री. केसरकर यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी)चे उपाध्यक्ष डॉ.संजय रामदथ, महानगरपालिकेच्या संचालक (नियोजन) डॉ. (श्रीमती) प्राची जांभेकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) राजू तडवी आदी यावेळी उपस्थित होते.

न्यूयॉर्क (अमेरिका) येथील बरो ऑफ मॅनहॅटन कम्युनिटी कॉलेज (बीएमसीसी) या समुदाय महाविद्यालयाशी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने केलेल्या सामंजस्य करारानुसार ही शिष्यवृत्ती ऑगस्ट २०२४ पासून देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी मुंबईतील जुहू स्थित श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) येथे संपर्क करावा. अधिक माहितीसाठी विद्यार्थिनींनी www.bmcc.cuny.edu/apply या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन डॉ. संजय रामदथ यांनी केले.

अशी मिळणार शिष्यवृत्ती

विविध व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींचा पहिल्या वर्षासाठीचा ट्युशन खर्च सदर महाविद्यालय उचलणार आहे. त्यामुळे विद्यार्थिनींवर कोणताही आर्थिक भार न येता त्यांचे शिक्षण सुरू राहणार आहे. या अभ्यासक्रमादरम्यान शिष्यवृत्तीप्राप्त दहा विद्यार्थिनींना राहण्याच्या खर्चातही सवलत देण्यात येणार आहे.

 

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!