पाणीपुरवठा योजना कामांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजना, जलजीवन मिशन, हर घर जल योजना आणि नळजोडणी कामांचा आढावा घेतला. पाणीपुरवठा योजना यशस्वी होण्याच्या दृष्टीने कामाच्या गुणवत्तेबाबत विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश श्री.पवार यांनी यावेळी दिले.
यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधीक्षक अभियंता वैशाली आवटे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री म्हणाले, वीजेअभावी योजना बंद पडण्याची समस्या दूर करण्यासाठी सौर ऊर्जेवर योजना राबवावी. ‘हर घर जल’ योजनेचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे. पाणीपुरवठा योजनेची कामे चांगल्या दर्जाची होतील व योजना बंद पडणार नाही याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कालबद्ध नियोजन करून योजना लवकर पूर्ण कराव्यात. पाणी वितरणासाठी पाईप चांगल्या दर्जाचे वापरावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.चव्हाण यांनी जिल्हा परिषदेकडील योजनांची आणि श्रीमती आवटे यांनी मजीप्राकडील योजनांची माहिती दिली.
फसव्या ठेकेदारामुळे आजही काही गावातील कामे बंदच
एकीकडे उपमुख्यमंत्री दर्जेदार कामासोबत वेळेत काम पुर्ण होण्याची अपेक्षा बाळगत असनाच पुणे जिल्ह्य़ातील काही तालुक्यातील कामे मोठ्याप्रमाणात धिम्या गतीने सुरू आहेत मुळशी तालुक्यातील कामासंदर्भात टाटा पॉवर कंपनीसोबत कोर्टात वाद सुरू आहे कारणाने तर शिरूर तालुक्यातील ठेकेदाराकडून खोटी बॅक गॅरंटी सादर करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी सदरच्या बी. जे. समृत या ठेकेदारा विरूध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची व शासनाकडून कंपनीचे नाव काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू आहे. असे फसवे ठेकेदार खोटे कागदपत्र शासनास सादर करून शासनाची फसवणूक करण्याची हिंमत करतात अश्याकडून दर्जेदार कामाची अपेक्षा करणे व्यर्थच आहे.या सर्व कारणांमुळे शासनाचे युध्द पातळीवर सुरू असलेल्या कामाची गती पुणे जिल्हामध्ये मात्र कमालीची मंदावलेली आहे.