पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेमार्फत दोन महिन्यात तब्बल २,४४,८८,६००/- रुपयांचा पेंडींग दंड वसुल..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात चाकण, भोसरी, तळेगाव हि औद्योगिक क्षेत्रे तसेच हिंजवडी, तळवडे, चिखली ही आयटी पार्क क्षेत्रे आहेत. या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या नागरीकांची संख्याही मोठी असुन त्यांचेमार्फत दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होत असुन वाहतुकीचे नियमांचे उल्लंघनदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरीकांवर पिंपरी चिंचवड वाहतुक शाखेमार्फत इ चलन प्रणालीव्दारे दंडात्मक करवाई करण्यात येत असुन दंडाची रक्कम हि मोठ्या प्रमाणात अनपेड असल्याचे इ चलन प्रणालीव्दारे दिसुन येत आहे.
मा. पोलीस आयुक्त श्री विनयकुमार चौबे यांचे आदेशाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत अनपेड दंडाची रक्कम वसुल करणेकरीता विशेष नाकाबंदी मोहिम राबविण्यात येत आहे.
या मोहिमे दरम्यान जानेवारी महिन्यामध्ये १,०२,२९,८५०/- रुपये व फेब्रुवारी महिण्यात मध्ये १,४२,५८,७५०/- रुपये असा एकुण २,४४,८८,६००/- एवढा दंड चालु वर्षात वसुल करण्यात आला आहे. यापुढेही अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी विशेष नाकाबंदीचे आयोजन करुन वाहनांवर अनपेड असलेला दंड वाहतुक विभागामार्फत वसुल करण्यात येणार असल्याने नागरीकांनी आपापले वाहनांवर असलेली पेंडिंग दंडाची रक्कम महाट्राफिक ॲप व्दारे किंवा जवळच्या वाहतुक विभागात जावुन दंडाची रक्कम भरावी जे वाहन चालक दंड भरणार नाहीत त्यांचेविरुद्ध मा. न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.
वाहनचालकांनी त्यांचे वाहनांवर पेंडिंग असलेल्या दंडाची रक्कम भरुन होणारी न्यायालयीन कार्यवाही टाळावी असे आवाहन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत करण्यात आले आहे.