ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुण्यातील विकासकामांचा केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी ‘दिशा’ बैठकीत घेतला आढावा

पुण्यातील पायाभूत सुविधांच्या कामाला गती देण्याच्या केंद्रीय राज्य मंत्र्यांच्या सूचना

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- पुणे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

या बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शरद चव्हाण, आमदार भिमराव तापकीर, संजय जगताप, रविंद्र धंगेकर यांच्यासह विविध आस्थापनांचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागांतील 17 विभागांच्या 41 केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पुणे विमानतळ, रेल्वे, वन विभाग, पुणे मेट्रो तसेच आदिवासी विभाग इ. विभागांचा समावेश होता.

यावेळी व्ही. मुरलीधरन यांनी पुण्यात सुरू असलेल्या विकासकामाबाबत समाधान व्यक्त केले. पुण्यातील पायाभूत सुविधांचे काम योग्यरित्या होत असून देशासाठी हे एक ‘रोल मॉडेल’ म्हणून समोर येईल, त्यासाठी आगामी काळात या योजनांच्या कामाला आणखी गती देऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्या पोहोचवण्यात याव्यात, अशी सूचना व्ही. मुरलीधरन यांनी संबंधितांना केली.

व्ही. मुरलीधरन म्हणाले की जिल्ह्यात पुणे मेट्रो, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग, पुणे-मिरज रेल्वे मार्ग, लोहगाव येथील विस्तारित विमानतळ, यासारख्या महत्वपूर्ण प्रकल्पांची कामे सुरु आहेत. शहराच्या विकासात या सुविधा महत्वाच्या ठरणार आहेत.

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना,अमृत,संगणीकृत सातबारा, पुणे मेट्रो, हर घर जल, किसान क्रेडिट कार्ड, प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- मनरेगा, बेटी बचाओ-बेटी पढाओ, दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, अशा विविध लोककल्याणकारी योजनांची पुणे जिल्ह्यात यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे, असेही व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले आहे.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!