पुणे

पुण्यात दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे विजय दिवस साजरा..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- पुणे येथील दक्षिण कमांड  युद्ध स्मारक येथे दि.16 डिसेंबर 2020 रोजी पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात विजय दिवस 2022 साजरा करण्यात आला. 51 वर्षांपूर्वी युद्धात, भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमहर्षक विजयाचे स्मरण म्हणून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.या युद्धातील भव्य विजयानंतर पाकिस्तानचे विभाजन होऊन, स्वतंत्र देश म्हणून बांगलादेश उदयाला आला आणि या विजयामुळे भारत आशिया प्रांतात एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला. भारताच्या पारंपरिक शत्रूवरील या निर्णायक विजयानंतर भारताची सैन्यदले देशाच्या सामर्थ्याचे एक भक्कम अंग असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

1971 साली पाकिस्तानचे तत्कालीन लष्करशहा जनरल याह्या खान यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी लष्कराने पूर्व पाकिस्तानमध्ये केलेल्या नृशंस हत्याकांडांमुळे भारतावर ही युद्धजन्य आपत्ती ओढवली. हे अल्पकाळ चाललेले मात्र अत्यंत भीषण स्वरूपाचे  युद्ध भारताच्या पूर्व आणि पश्चिम दोन्ही सीमांवर लढले गेले. 13 दिवसांच्या या युद्धानंतर, पाकिस्तानी सैन्य पूर्णपणे शरण आले आणि त्यानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. या युद्धात, भारतीय सैन्य, पाकिस्तानी लष्करावर सर्व दृष्टीनी वरचढ ठरले. युद्धादरम्यान, दक्षिण कमांडच्या सैन्याने शौर्य गाजवत पाकिस्तानच्या कारवायांपासून देशाच्या सीमांचे रक्षण केले. या युद्धादरम्यान दक्षिण कमांड क्षेत्राकडील जबाबदारीच्या  क्षेत्रात लढल्या गेलेल्या गाजलेल्या लढायांमध्ये लोंगेवाला  लढाईत पाकिस्तानी सैन्याचा भारतीय जवानांनी धुव्वा उडवला होता. लेफ्टनंट कर्नल भवानी सिंग (नंतर ब्रिगेडियर),  यांच्या नेतृत्वाखाली 10 पैरा कमांडो बटालियनने पाकिस्तानामधल्या छाछरो गावात घुसून परबत अलीवर मिळवलेला ताबा ही दक्षिण कमांडची आणखी एक गाजलेली लढाई होती. या लढायांमध्ये भारतीय सैन्याचे शौर्य, दृढनिश्चय आणि पराक्रमाचे सर्वांना दर्शन घडले.

आपल्या महान राष्ट्राच्या सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देण्यापूर्वी एकदाही विचार केला नाही अशा भारतीय सशस्त्र दलातील शूर सैनिक, हवाई दल आणि नौसैनिकांना  आदरांजली अर्पण करण्यासाठी दक्षिण कमांड युद्ध स्मारक येथे पुष्पअर्पण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दक्षिण कमांड मुख्यालयाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार यांनी पुष्पचक्र अर्पण केले. या कार्यक्रमाला पुणे स्थित लष्करी अधिकारी आणि जवान तसेच 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभागी झालेल्या भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाचे ज्येष्ठ माजी सैनिक उपस्थित होते. त्यानंतर शूर वीरांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही क्षण  मौन पाळण्यात आले.

 

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!