बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर (मोका) कायद्यांतर्गत कारवाई..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिकेत कोंढरे याच्यासह टोळीतील चारजणांविरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार घेतल्यापासून आतापर्यंत गुन्हेगारी टोळ्यांवरील ११ वी कारवाई आहे.
अनिकेत ऊर्फ अंड्या विजय कोंढरे (वय २२), रितेश विजय कोंढरे (वय २४, दोघे रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी), अंकित ऊर्फ अभिषेक सोमा (वय २४, रा. श्रीनाथ टेरेस, साईनगर, कोंढवा बुद्रूक), विशाल लक्ष्मण रेणुसे (वय २२, रा. बालाजीनगर, धनकवडी) अशी कारवाई केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. रितेश कोंढरे आणि विशाल रेणुसे या दोघांना अटक केली आहे.
या टोळीने गेल्या २१ डिसेंबर रोजी बिबवेवाडी परिसरात दहशत निर्माण करून एका फिर्यादीच्या डोक्यात हत्याराने वार केले होते. तसेच, त्यांच्या घरावर लाथा मारून खिडकीच्या काचा फोडल्या होत्या. टोळीप्रमुख अनिकेत कोंढरे आणि त्याच्या साथीदारांवर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बिबवेवाडी पोलिसांनी कोंढरे आणि साथीदारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. परंतु त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्यामुळे बिबवेवाडी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात मोका कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त यांच्याकडे दिला होता.