बीएसएनएल देणार कोणतेही मोबाईल कवरेज नसणा-या देशातील 28 हजार गावांमध्ये 4 जी मोबाईल सेवा..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- देशातील अशा गावांमध्ये ज्या गावात कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा 28 हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट 4 जी मोबाईल सेवा देण्याची सुरुवात ‘4 जी सॅच्युरेशन प्रकल्पा ‘अंतर्गत करण्यात येणार असल्याची माहिती भारत संचार निगम लिमिटेड –बीएसएनएल, नवी दिल्लीच्या कार्पोरेट कार्यालयाच्या मानव संसाधन विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. जगामध्ये मोबाईल उत्पादक तसेच 3जी, 4 जी आणि 5 जी सेवा देणाऱ्या काही मोजक्याच कंपन्या आहेत. याच क्रमामध्ये भारतात सुद्धा 3 जी, 4 जी आणि 5 जी टेलिकॉम सेवा देणारी मोबाईल कंपनी असली पाहिजे या उद्देशाने भारत सरकार प्रयत्न करत आहे.बीएसएनएल द्वारे पदार्पण केलेली 4-जी सेवा ही विश्वस्तरावरील राहणार असून या सेवेला 5 जी सेवेमध्ये रुपांतरित होण्याला वेळ लागणार नाही. सध्याचे 4 जी उपकरण 5 जी मध्ये अपडेट होतील, अशी माहिती वडनेरकर यांनी दिली. राज्यामध्ये 4,900 खेड्यांमध्ये बीएसएनएलच्या 4 जी सेवेची सुरुवात करण्यात येणार असून यामध्ये प्रामुख्याने गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर यासारख्या दुर्गम भागामध्ये मोबाईल टॉवर्स 4 जी मध्ये अपडेट करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलं.
याप्रसंगी बीएसएनएलचे नागपूर क्षेत्राचे महाव्यवस्थापक यश पान्हेकर यांनी सांगितलं की, भारतात बनणाऱ्या मोबाईलमुळे ग्राहकांच्या कॉलची, डेटाची सिक्युरिटी सुनिश्चित होईल त्याचप्रमाणे यामुळे रोजगार उपलब्धता होऊन तंत्रज्ञानाची निर्यात वाढेल. महाराष्ट्र सर्कलचे बीएसएनएलच्या एकूण महसूल आणि संकलनामध्ये जवळपास 20% योगदान असल्याची माहिती महाराष्ट्र टेलिकॉम सर्कलचे मुख्य महाव्यवस्थापक रोहित शर्मा रोहित शर्मा यांनी दिली.