भाजपाने रिपब्लिकन पक्षाला गृहीत धरू नये – संगीताताई आठवले
कोल्हापूर, निर्भीड वर्तमान:- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया फक्त राजकीय पक्ष नाही तर तो एक विचार आहे. विचाराच्या पक्षाला जर भारतीय जनता पार्टी विचारात घेत नसेल आणि आम्ही मागितल्याप्रमाणे आम्हाला लोकसभेचा शिर्डी आणि सोलापूर मतदार संघ मिळत नसेल तर आम्हाला त्यांनी गृहीत धरू नये असे महाराष्ट्र राज्याच्या महिला आघाडीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष संगीताताई आठवले यांनी सुनावलं आहे.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महिला आघाडीच्या वतीने भव्य परिवर्तन महिला महामेळावा कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष स्थानावरून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जागतिक महिला दिन आणि बहिष्कृत वर्गाची माणगाव परिषद दिनाचे औचित्य साधून भव्य महिला परिवर्तन महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उद्घाटन जिजाऊ, अहिल्याबाई, सावित्री, रमाई, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून संगीताताई आठवले व मान्यवरांच्या मंगल हस्ते करण्यात आले.
नामदार रामदासजी आठवले तसेच महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा यांच्या तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाने हा मेळावा “न भूतो न.. भविष्यती” असा झाला आहे.
संगीताताई आठवले पुढे म्हणाल्या की, कोल्हापुरात रिपब्लिकन पक्षाची महिला आघाडी हजारोंच्या संख्येने आहे. हे आजच्या मेळाव्यातून मला दिसलं आणि याने माझे डोळे दीपवले. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे हे माय भगिनींच्या पाठीमागे खंबीर उभा आहे. आणि म्हणूनच या माय भगिनींच्या केसाला कोणीही धक्का लावत नाही. आणि तीच माय भगिनी आज या महिला मेळाव्याच्या माध्यमातून निळा फेटा आणि निळा स्कार्फ घालून दिमाखात इथं आली आहे. याचं मला खूपच कौतुक वाटतं. रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीचा हा मेळावा हजारोंच्या संख्येची उपस्थिती प्रस्थापित व्यवस्थेलाही लाजवणारी होती.
यावेळी वक्ते म्हणून विजय काळे म्हणाले की, रिपब्लिकन पक्षाची चळवळ ही आता नाही. तर मराठवाडा नामविस्ताराच्या चळवळीपासून उभी आहे.महिलांनी मोठा त्याग करून ही चळवळ उभा केली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून जर अशीच एकी आणि असाच लढाऊबाणा ठेवला तर भिमाची ही लेक भविष्यकाळात राजकारण आणि समाजकारणात दबदबा निर्माण करेल. यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या महिलांनी 1) शिर्डी मतदार संघ हा नामदार रामदास आठवलेंना मिळावा 2) शिर्डी आणि सोलापूर ही लोकसभा मतदारसंघावर रिपब्लिकन पक्षाचा खासदार असावा आणि ही उमेदवारी रिपब्लिकन पक्षाला मिळावी. 3) राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिपब्लिकन पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याला मिळावे. 4) महिलांच्या असणाऱ्या 33% आरक्षणामध्ये मागासवर्गीय महिलांना स्वतंत्र आरक्षणाचा दर्जा असावा असे ठराव करण्यात आले. या ठरावाला सर्व महिलांनी हात उंच करून व टाळ्यांचा गजर करून मान्यता दिली.
राज्य व जिल्हा महिला आघाडीच्या वतीने कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांचा निळा फेटा, शाल,पुष्पगुच्छ व शाहू राजांचे पुस्तक देऊन संगीताताई आठवले यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. वंदनाताई कांबळे यांची पश्चिम महाराष्ट्र सचिवपदी निवड झाल्याबद्दल व आर.पी.आय गगनबावडा तालुकाध्यक्ष तानाजी कांबळे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षा शशिकला वाघमारे, कोल्हापूर युवती अध्यक्ष अंजली कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष सोनाली आवडे, जिल्हाप्रमुख निर्मलाताई धनवडे, अर्चना माळगे यांनी मनोगते व्यक्त केली. या मेळाव्याला वैशाली कांबळे, जयश्री जावळे, नुरजान शेख,शिल्पा यादव, यशोदा वनक्षे, शोभा कुरणे,भारती जाधव, छाया कांबळे, पुनम कांबळे यासहित हजारो महिला या महामेळाव्यात सहभागी झाल्या होत्या.या कार्यक्रमाचे स्वागत पश्चिम महाराष्ट्राच्या नूतन सचिव वंदनाताई कांबळे यांनी केले. प्रास्ताविक महिला आघाडीच्या अध्यक्षा नंदाताई भास्कर यांनी केले तर आभार शारदा निकाळजे यांनी मानले आहेत.