ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) पश्चिम प्रादेशिक मुंबई कार्यालयाने साजरा केला स्थापना दिन..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- भारतीय मानक ब्युरोच्या पश्चिम प्रादेशिक कार्यालयाने मुंबईतील त्यांच्या प्रादेशिक कार्यालय संकुलात 76 वा स्थापना दिन साजरा केला.

बीआयएस पश्चिम क्षेत्रचे उपमहासंचालक निशात एस हक, मुंबई शाखा कार्यालय I आणि II चे संचालक संजय विज आणि बीआयएस पश्चिम प्रादेशिक प्रयोगशाळेचे संचालक ए पी द्विवेदी यांनी या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. या संमेलनात सरकारी अधिकारी, उद्योगांचे प्रतिनिधी, ग्राहक हक्क आणि ग्राहक संरक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि संघटना , बीआयएस द्वारे प्रवर्तित स्टँडर्ड्स क्लबचे यजमानपद भूषवणाऱ्या शैक्षणिक संस्था आणि रोटरी क्लबचे प्रतिनिधी अशा विविध क्षेत्रातील व्यक्तींना आमंत्रित केले होते.

सर्वसाधारणपणे ग्राहक आणि उद्योग यांच्या हितासाठी बीआयएस द्वारे चालवले जाणारे विविध उपक्रम, व्यवस्थापन प्रणालीचे मानकीकरण आणि प्रमाणीकरण आणि दर्जेदार परिसंस्था निर्माण करण्यात आणि गुणवत्ता संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात विविध भागधारकांची भूमिका यावर व्यापक चर्चा करण्यात आली. उत्पादने, प्रक्रिया आणि सेवांसाठी भारतीय मानकांमध्ये शाश्वतता आणि शाश्वत विकास उद्दिष्टे या घटकांचा समावेश करण्याच्या प्रणालीवरही चर्चा करण्यात आली.

बीआयएस ही भारताची राष्ट्रीय मानक संस्था आहे, जिच्याकडे राष्ट्रीय मानके आखण्याची आणि अंमलबजावणीची जबाबदारी आहे.आयएसआय मार्क (उत्पादित आणि प्रक्रिया -युक्त उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी), हॉलमार्क (सोन्या/चांदीच्या दागिन्यांच्या शुद्धता प्रमाणपत्रासाठी), नोंदणी चिन्ह (इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या प्रमाणीकरणासाठी) या मानकांद्वारे बीआयएस वस्तू, सेवा, प्रक्रिया इत्यादींचे गुणवत्ता प्रमाणीकरण सुनिश्चित करते. सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता चाचणी आणि हॉलमार्किंग बीआयएस द्वारे असेईंग आणि हॉलमार्किंग केंद्रांच्या नेटवर्कद्वारे केले जाते. हा केंद्रे बीआयएसने मान्यता दिलेली चाचणी आणि प्रमाणीकरण केंद्रे आहेत.

यावेळी बोलताना बीआयएस पश्चिम क्षेत्रचे उपमहासंचालक निशात एस हक यांनी मानकीकरण आणि गुणवत्ता जागरूकता वाढवण्यासाठी विविध उद्योगांनी हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांचे आणि योगदानाचे स्मरण केले. गुणवत्तेच्या चळवळीला आकार देण्यासाठी आणि ती प्रगल्भ करण्यासाठी सरकारी संस्था, उद्योग, तंत्रज्ञ आणि ग्राहक यांच्यात सामूहिक प्रयत्न आणि सहकार्याची गरज असून विद्यार्थ्यांना जीवनाच्या सर्व क्षेत्रात गुणवत्तेबाबत विचार आणि कृती या बाबतीत अभिमुख करण्यात शैक्षणिक संस्था महत्वाची भूमिका बजावू शकतात यावरही त्यांनी भर दिला.

या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भारतीय मानक ब्युरोने काही उद्योग कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांवर गुणवत्तेचे आयएसआय चिन्ह वापरल्याबद्दल प्रमाणित केलेल्या भारतातील पहिल्या कंपन्या म्हणून सन्मानित केले. सन्मानित उद्योगांमध्ये एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड लि. जेएसडब्ल्यू स्टील लि., टेकफॅब (इंडिया) इंडस्ट्रीज लि., अडोर वेल्डिंग लि. आणि जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रोडक्ट्स लि.यासारख्या नामांकित उद्योगांचा समावेश आहे. IS/ISO 21001 नुसार केएमई सोसायटीचे जी. एम . मोमीन महिला महाविद्यालय हे शैक्षणिक संस्था व्यवस्थापन प्रणालीसाठी प्रमाणित होणारी भारतातील पहिली शैक्षणिक संस्था म्हणून गौरवण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ मुंबई आणि सेंट जॉन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अँड रिसर्च, के के वाघ कला, वाणिज्य आणि विज्ञान आणि कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालय , के सी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीज, पिल्लई हॉक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि व्हीपीएमके कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यासारख्या राज्यातील काही नामवंत शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांना देखील त्यांच्या संबंधित संस्थांमधील मानक क्लबच्या माध्यमातून ग्राहक सशक्तीकरण प्रयत्नांमध्ये आणि गुणवत्ता जागृकतेला प्रोत्साहन देण्यासाठी बीआयएस सह भागीदारी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

मुंबई ग्राहक पंचायत, अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद, आराध्या वुमन वेल्फेअर सोसायटी आणि ऑल इंडिया अँटी करप्शन बोर्ड यासारख्या मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांही या संमेलनात सहभागी झाल्या होत्या.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!