भारतीय संघाने सामन्यात सलग तिसऱ्यांदा अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरले..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- भारतीय संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात सलग तिसऱ्यांदा अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषकावर नाव कोरले आहे.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी दिल्ली येथे परतलेल्या भारतीय अंध क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार केला आहे. या संघाने गेल्या शनिवारी बेंगळूरू येथील चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात बांगलादेशच्या संघावर प्रभावी विजय मिळवत अंधांसाठीच्या टी-20 विश्वचषकावर सलग तिसऱ्यांदा वर्षी आपल्या देशाचे नाव कोरले.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, सीएबीआय अर्थात अंधांसाठीच्या क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष महंतेश जीके यांच्यासह क्रीडा विभाग, एमवायएएस, सीएबीआय तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे इतर मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी, उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “आपल्या देशातील सर्व खेळाडूंना, विशेषतः आपल्या दिव्यांग क्रीडापटूंना सर्वोत्तम पाठबळ पुरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. या विजयी संघातील सर्व सदस्यांना यापुढेही असाच पाठींबा मिळेल आणि त्यांच्या मार्गातील सर्व आव्हानांवर उपाययोजना केल्या जातील अशी ग्वाही मी देतो.”
या क्रिकेट संघातील अंध खेळाडूंच्या कुटुंबीयांनी त्यांना दिलेल्या पाठिंब्याची दखल घेत केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, “या संघातील सर्व खेळाडूंशी संबंधित सर्व कुटुंबीयांनी त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा दिला आहे. कुटुंबाचे पाठबळ नसते तर यापैकी अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळविणे शक्य झाले नसते.”
बांगलादेशच्या संघाला 120 धावांनी पराभूत करणाऱ्या अंध सदस्यांच्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार अजय कुमार याने सांगितले, “केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून सातत्याने मिळालेल्या पाठींब्यामुळे आम्हांला ही विजयी खेळी साकारण्यास प्रोत्साहन मिळाले. प्रचंड मेहनत आणि असंख्य अडचणींवर मात केल्यानंतर हे यश मिळाले आहे. मात्र, मैदानावर गेल्यानंतर आम्ही आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाखेरीज इतर कशाचाही, अगदी आमच्या समोरील अडथळ्यांचा देखील विचार करत नाही. आमच्या संघाने 5 विश्वचषक जिंकले आहेत आणि यापुढेही आम्ही अशीच विजयी कामगिरी करून दाखवू असा विश्वास आमच्यात निर्माण झाला आहे.”
टी-20 विश्वचषक विजेत्या अंध खेळाडूंच्या भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघात देशाच्या 10 राज्यांमधून निवडलेल्या 17 खेळाडूंचा समावेश आहे. त्यामध्ये बी1 प्रकारातील (संपूर्ण अंध) 6 खेळाडू, बी2 प्रकारातील (अंशतः अंध) 5 खेळाडू, तर बी3 प्रकारातील (6 मीटर अंतरापर्यंतचे पाहू शकतात असे) 6 खेळाडू यांचा समावेश आहे. भारतीय अंध संघाने पाकिस्तानच्या संघावर मात करत 2012 आणि 2017 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकले होते.