भारत आणि सौदी अरेबिया दरम्यान ऊर्जा क्षेत्रात सहकार्य करारावर स्वाक्षरी
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात सहकार्याबद्दल सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. भारत आणि सौदी अरेबिया दरम्यानच्या या करारावर नवी दिल्लीत ऊर्जा मंत्री आर के सिंह आणि सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री अब्दुल्ला अझिज बिन सलमान बिन अब्दुल्ला अझिज अल सौद यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
या सामंजस्य करारानुसार, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात खालील बाबींवर सहकार्य होणार आहे :
• अक्षय ऊर्जा, ऊर्जा कार्यक्षमता, हायड्रोजन, वीज आणि दोन देशांमधील ग्रीड जोडणी, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, धोरणात्मक पेट्रोलियम साठे आणि ऊर्जा सुरक्षा.
• अक्षय ऊर्जा, वीज, हायड्रोजन आणि आणि तेल आणि वायू साठवण क्षेत्रात द्विपक्षीय गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.
• चक्राकार अर्थव्यवस्था आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी त्याचे तंत्रज्ञान, जसे की: कार्बन कॅप्चर, वापर आणि साठवण.
• ऊर्जा क्षेत्रात डिजिटल परिवर्तन, नवोन्मेष आणि सायबर-सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणे.
• उर्जेशी संबंधित सर्व क्षेत्रे, पुरवठा साखळ्या आणि त्यांच्या तंत्रज्ञानाशी संबंधित साहित्य, उत्पादने आणि सेवांना स्थानिक वापर करण्यासाठी दोन्ही देशांमधील गुणात्मक भागीदारी विकसित करण्यावर काम करणे.
• ऊर्जा क्षेत्रात प्राविण्य असलेल्या कंपन्यांशी सहकार्य अधिक दृढ करणे.
• ऊर्जा क्षेत्राशी संबंधित इतर कुठल्याही क्षेत्रांबद्दल सहकार्य करण्यास दोन्ही देशांची सहमति असल्यास.
या सामंजस्य करारामुळे, भारत आणि सौदी अरेबिया यांच्यात ऊर्जा क्षेत्रात एक मजबूत भागीदारी विकसित होईल. हा सामंजस्य करार भारताच्या ऊर्जा संक्रमणाला तसेच हवामान बदलाच्या दृष्टीने जागतिक ऊर्जा व्यवस्थेतील परिवर्तनाला पाठबळ मिळू शकेल.