माथाडीच्या नावाखाली व्यापा-यास खंडणी मागणा-यावर खंडणी विरोधी पथकाची कारवाई
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- वारजे माळवाडी येथील काचेच्या व्यापा-याच्या दुकानात आलेला काचेचा टेम्पो खाली करण्यासाठी खंडणी मागत असल्याबाबतची खबर पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांना मिळाली होती, सपोनि अभिजीत पाटील व खंडणी विरोधी पथक १ कडील पोलीस अमंलदार यांनी सदर ठिकाणी जावुन बातमीची शहानीशा केली असता मिळालेल्या माहितीनुसार अविनाश अडगळे याने टेम्पो मधून माल खाली करण्याचे काम हे त्याला माथाडी संघटनेकडून भेटले असल्याचे सांगितले. त्यावेळेस फिर्यादी यांनी त्यास माल खाली करणेसाठी किती पैसे घेणार असे विचारले असता त्याने वाराई चे ४,०००/- रु व खाली करण्याचे ४,०००/- रु. मागितले.तेव्हा फिर्यादीने त्यास दरपत्रकाप्रमाणे रक्कम घेवून माल खाली करण्यास सांगितले. अडगळे याने त्यास नकार देवून माल खाली करण्याचे ८,०००/- रुपये दिले नाहीतर व्यापारी व माल उतरविणारे कंपनीचे कामगार यांना माल उतरू देणारे नाही व मारहाण करणेची धमकी दिली.
दिलेल्या तक्रारी वरून माथाडी कामगार अविनाश दिलीप अडगळे वय ३२ वर्षे याच्या विरुध्द वारजे पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गु.र.नं. ५२/२०२३ भादंवि कलम ३८५, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करून पुढील तपासकामी वारजे पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री. अमोल झेंडे, मा. सहायक पोलीस आयुक्त १ गुन्हे, श्री. सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अजय वाघमारे, सपोनि अभिजीत पाटील, पोउनिरीक्षक विकास जाधव पोलीस अंमलदार किरण ठवरे, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, अमोल आवाड, राजेंद्र लांडगे, प्रफुल्ल चव्हाण, अमर पवार, संभाजी गंगावणे यांनी केली आहे.