मानवाधिकार आयोग सदस्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र येवलेवाडी येथे तृतीयपंथीकरीता कार्यशाळा संपन्न
निर्भीड वर्तमान :-पुणे, दि. २३: राज्य मानवाधिकार आयोग, सहायक आयुक्त समाज कल्याण, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र आणि अनाम प्रेम परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने तृतीयपंथीकरीता आयोजित तीन दिवसीय कार्यशाळा राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्र येवलेवाडी येथे रविवारी संपन्न झाली.
राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य सचिव नितीन पाटील, सदस्य एम. ए. सय्यद, राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्राच्या डॉ. सत्य लक्ष्मी, अनाम प्रेम परिवाराचे भास्कर बिडये यांच्यासह राज्यभरातून वीस जिल्ह्यातील तृतीयपंथीय प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. पाटील म्हणाले, तृतीयपंथीयाच्या कल्याणाकरीता शासनाच्यावतीने देण्यात आलेला निधी वेळेत खर्च होईल, याबाबत सर्व संबंधित विभागाने दक्षता घ्यावी. शासनाच्या लोककल्याणारी योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही करावी. आधारकार्ड देण्यासाठी शिबीरे आयोजित करावीत. राष्ट्रीय निसर्गोपचार केंद्रातील
आरोग्याबाबतचे विविध कार्यक्रम होत असतात त्यांचा तृतीथपंथीयांनी लाभ घ्यावा. याबाबत तृतीथपंथी समुदायाला जागृत करावे.
तृतीथपंथीयांनी कृषी आणि कापड उद्योग क्षेत्रात रोजगाराच्या अनुषंगाने बघावे. महिला बचत गटाच्या उत्पादित खाद्यपदार्थ, वस्तुंना विक्रीकरीता आरक्षण देण्यात आले असून त्याचप्रमाणे तृतीथपंथी समुदायाने विविध खाद्य पदार्थ, वस्तू उत्पादनावर भर द्यावा. तसेच त्यांच्याद्वारे निर्मित उत्पादनांना बाजारपेठेत आरक्षणाकरीता प्रयत्न करावे. या समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामाहून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही श्री. पाटील यांनी केले.
डॉ. सत्य लक्ष्मी यांनी तृतीयपंथी रुग्णांसाठी विशेष कक्ष सुरू करण्याबाबत सूचना केल्या. डॉ. मेघश्याम गुर्जर यांनी खादी आणि कापड उद्योग क्षेत्रात होणारी रोजगार निर्मिती तसेच संतोष चव्हाण यांनी कृषी होणारी रोजगार निर्मितीबाबत माहिती दिली. खुले कारागृहातील कैद्यासोबत शेतीच्या उपक्रमात तृतीयपंथीयांचा सहभाग याविषयावर चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर येथील मैत्री फाऊंडेशनच्या तृतीयपंथी
प्रतिनिधी शिवानी गजबर यांनी मानवाधिकार कायद्यांची माहिती, तृतीयपंथीची समाजासाठी उपयुक्तता या विषयावर माहिती दिली. अनाम प्रेम परिवाराचे श्री. बिडये यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. अनाम प्रेम परिवार गेल्या १८ वर्षांपासून तृतीयपंथीय व्यक्तींच्या सामाजिक अधिकारांसाठी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शरीर स्वास्थ्य व निसर्गोपचार, मानवाधिकार कायदा, महाराष्ट्र राज्य तृतीयपंथीय धोरणावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येऊन सांस्कृतिक कार्यक्रमाने कार्यशाळेचा समारोप करण्यात आला.