आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

मिरजेतील सुपरस्पेशालिटी हॉस्पिटला तत्त्वतः मान्यतेसंदर्भातील कार्यवाही करावी – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

वैद्यकीय महाविद्यालयातील सोयी-सुविधांचा घेतला आढावा

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा: – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुपरस्पेशालिटी रूग्णालयाचे बांधकाम व विद्यार्थी वसतिगृह बांधकामाला तत्वत: मान्यता देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील इमारत बांधकाम व अन्य सोयी-सुविधांबाबत झालेल्या आढावा बैठकीच्या अध्यक्ष- स्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या या बैठकीस खासदार संजय पाटील, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव डॉ. अश्विनी जोशी, वैद्यकीय शिक्षण व आयुष्यचे आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरजचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कीर्तीकुमार मिरजकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.

या बैठकीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल बांधणे व विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची इमारत बांधकाम करण्यासंदर्भात तत्वत: मान्यता देण्यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सचिव, वैद्यकीय शिक्षण यांना दिल्या. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनास सादर करण्यात येईल. या प्रस्तावांतर्गत 200 खाटांचे रुग्णालय बांधकाम तसेच पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, अध्यापक व इतर मनुष्यबळ, यंत्र सामुग्री व साधन सामुग्री यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमाअंतर्गत वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी एकूण 13 अभ्यासक्रम राबविण्याबद्दल बैठकीत चर्चा करण्यात आली. या प्रस्तावांतर्गत बांधकामासाठी आकारण्यात आलेले दर तपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुन्हा सादर करण्याबाबत तसेच अल्पसंख्याक विभागाकडून प्रशासकीय मान्यता तात्काळ मिळवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना श्री. मुश्रीफ यांनी दिल्या. तसेच, पॅरामेडिकल सायन्स योजना अंतर्गत महाविद्यालयाच्या बांधकामासाठीचा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
यावेळी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली येथे 500 खाटांचे नवीन रुग्णालय, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तसेच शवागृह आदि बाबींसाठी दोन महिन्यांच्या आत आवश्यक कार्यवाही करुन निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भारतीय परिचर्या परिषदेच्या मानकांनुसार पुरेसा नर्सिंग स्टाफ नसल्यामुळे विविध आजारांवर उपचार करताना अपुरे मनुष्यबळ व साधने यांच्या मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर या रुग्णालयात 100 प्रवेश क्षमतेचे बी. एस्सी नर्सिंग महाविद्यालय सुरु केल्यास त्याचा फायदा जिल्ह्याला होईल. या अनुषंगाने बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर पुढील मंत्रीमंडळ बैठकीपर्यंत प्रस्ताव सादर करण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण उपसचिव श्री. सूर्यवंशी यांनी दिली.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!