मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 29.7 कोटी रुपयांचे कोकेन जप्त..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मुंबईच्या सीमाशुल्क विभागाने 29.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे तस्करी केलेले कोकेन जप्त केले आहे. अदिस अबाबा मार्गे लागोसहून मुंबईला प्रवास करणाऱ्या दोन नायजेरियन नागरिकांकडून अंमली पदार्थांची भारतात तस्करी होऊ शकते अशी माहिती गुप्तचर विभागाने दिली होती. या खबरीच्या आधारे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई विभागीय युनिटच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने पाळत ठेवून ही कारवाई केली आहे.
महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय अधिकाऱ्यांच्या) पथकाने संशयित प्रवाशांना अडवले. नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) पदार्थ त्यांनी गिळून शरीरात लपवल्याचा त्यांच्यावर संशय होता. त्यामुळे त्यांना अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यांनी या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते.
दोन प्रवाशांनी 3 दिवसांच्या कालावधीत काही विशिष्ट अंमली पदार्थ असलेल्या 167 कॅप्सूलचे सेवन केल्याची पुष्टी वैद्यकीय तपासणी अहवालातून मिळाली. या प्रवाशांकडे सापडलेल्या पदार्थाची चाचणी घेतल्यानंतर त्यात कोकेन असल्याचे आढळून आले. त्यांच्याकडे सापडलेल्या कॅप्सूलमधून एकूण 2.976 किलो कोकेन एनडीपीएस कायदा, 1985 नुसार जप्त करण्यात आले आहे. अवैध आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनचे मूल्य सुमारे रु. 29.76 कोटी रूपये आहे.
दोन्ही प्रवाशांना अटक केल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.