मुंबईमध्ये केलेल्या विविध कारवायांच्या माध्यमातून 7 किलोपेक्षा जास्त कोकेन जप्त
शहरातील सुरू असलेल्या छुप्या अंमली पदार्थ विक्री विरोधी धडक कारवाई करावी नागरिकांकडून मागणी
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीकडून गुन्ह्यांसाठी नवीन शक्कल लढवून करून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करण्याचे अनेक प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाने उघडकीला आणले आहेत.
अंमली पदार्थांच्या तस्करीच्या एका प्रकरणात दिल्ली विमानतळाच्या माध्यमातून नैरोबीहून आणलेले अंमली पदार्थ विरार येथील एका भारतीय नागरिकाकडून हस्तगत करण्यात आले.
गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या 4 प्रकरणांपैकी दोन प्रकरणात लागोपाठ केलेल्या कारवायांमध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने दोन व्यक्तींना त्यांच्या ट्रॉली बॅगांच्या छुप्या पोकळ्यांमध्ये अंमली पदार्थ लपवून आणण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले.
इतर दोन प्रकरणांमध्ये अंमली पदार्थांच्या वाहकांनी या पदार्थांनी भरलेल्या कॅप्सूल गिळल्या होत्या आणि त्यांच्या पोटातून या कॅप्सूल बाहेर काढण्यासाठी त्यांना जे. जे. रुग्णालयात दाखल करावे लागले.
या कारवायांमध्ये अवैध बाजारात अंदाजे 70 कोटी रुपये मूल्य असलेले एकूण सुमारे सात किलो कोकेन जप्त करण्यात आले. या प्रकरणांमध्ये 4 व्यक्तींना ( 3 पुरुष आणि 1 महिला) अटक करण्यात आली असून त्यापैकी दोन पुरुष भारतीय आहेत आणि उर्वरित दोन परदेशी नागरिक आहेत.
एका प्रकरणात डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जिवंत काडतुसांसह विना परवाना बाळगण्यात आलेली बंदूक जप्त केली. जप्त केलेले शस्त्र पुढील तपासाकरिता स्थानिक पोलिसांकडे सोपवण्यात आले आहे.
अंमली पदार्थांच्या विळख्यापासून समाजाला सुरक्षित राखण्यासाठी अंमली पदार्थांच्या तस्करांच्या टोळ्यांकडून तस्करीसाठी केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या कार्यपद्धतींचा शोध घेऊन त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यास महसूल गुप्तचर संचालनास वेळोवेळी यश मिळाले आहे. याच बरोबर स्थानिक अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील सुरू असलेल्या छुप्या अंमली पदार्थ विक्री विरोधी धडक कारवाई करावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.