ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसंगावधान दाखवत वाचवले दुचाकीस्वाराचे प्राण

जखमी रुग्णाला घेऊन मुख्यमंत्री स्वतः पोहोचले हॉस्पिटलमध्ये समयसूचकतेमुळे चार रुग्णांचे वाचले जीव

नागपूर, दि. 18 ( निर्भीड वर्तमान ):- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवदूताप्रमाणे धावून आल्याने एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. या व्यक्तीसह अन्य तिघांना मदत करुन मुख्यमंत्र्यांनी त्यांना तत्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्याचे निर्देश संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांना दिले.

 

मुंबईहून नागपुरला परतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ बाजार गावातील सोलर अर्नामेंट्स कंपनीला भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा आढावा घेऊन पुन्हा नागपुरकडे परतत असताना गोंडखैरीच्या बस स्थानकाजवळ एक अपघात झाल्याचे त्यांना समजले. याठिकाणी झालेल्या भीषण अपघातात एका ट्रक आणि बाईकची धडक होऊन बाईकचालक ट्रकच्या बोनेटमध्ये जाऊन अडकला होता. त्याचवेळी त्या ट्रकला एक वेगन आर कारही येऊन धडकली. त्यातही गाडीतले काही जण जखमी झाले. अपघात झाल्याचे कळताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमली, ही परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी आपला ताफा तिथे थांबवायची सूचना केली. त्यानंतर ते स्वतः खाली उतरले. त्या ठिकाणी उभे राहून त्यांनी त्या तरुणाला प्रयत्नपूर्वक ट्रकखालून बाहेर काढायला लावले. त्याचा पाय गंभीर जखमी असल्याने तत्काळ त्याला आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन ते स्वतः त्याला नागपुरातील रवी नगर चौकातील सेनगुप्ता रुग्णालयात घेऊन आले.

 

या तरुणाला तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू झाले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे.

या तरुणाचे नाव गिरीश केशरावजी तिडके असे असून तो नागपूरच्या गोंड खैरीवाडी येथील रहिवासी आहे. त्याच्याशिवाय या अपघातात जखमी झालेले वंदना राकेश मेश्राम (सिद्धार्थ नगरवाडी, नागपूर), रंजना शिशुपाल रामटेके (राहणार रामबाग मेडिकल चौक नागपूर) आणि शुद्धधन बाळूजी काळपांडे (राहणार मौदा नागपूर) यांनाही रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू झाले आहेत.

या तरुणाला बाहेर काढण्यापासून त्याला रुग्णालयात दाखल करेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः रुग्णालयात उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालक बनून या जखमी रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे हे सर्व प्रवासी सुरक्षीत असून त्यांची प्रकृती आता स्थीर आहे. मुख्यमंत्र्यांनी समयसूचकता दाखवून केलेल्या या मदतीबद्दल या रुग्णांच्या कुटूंबियांनी त्यांचे आभार मानले आहेत.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!