मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेचा प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

मुंबई. दि. 09 :- महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” ही योजना सुरु करण्यात आलेली असून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांत “नोंदणी कक्ष” सुरू करण्यात आलेले आहेत. या अनुषंगाने योजनेची कार्यवाही सुनियोजित पध्दतीने व गतीमान रितीने व्हावी याकरिता संबंधित अधिकारी, कर्मचारीवृंदाचे विशेष प्रशिक्षण नमुंमपा मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी समाजविकास विभागाचे उपआयुक्त आणि या योजनेचे मुख्यालय स्तरावरील नोडल अधिकारी श्री.किसनराव पलांडे यांनी महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने या योजनेचे महत्व विशद करीत महानगरपालिका क्षेत्रातील एकही पात्र महिला या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये अशाप्रकारे आपल्याला काम करायचे आहे असे स्पष्ट केले. या योजनेची माहिती महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी विविध प्रचार व प्रसार माध्यमांचा प्रभावी उपयोग करणे व लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी अर्ज दाखल करण्यापासून सर्वोतोपरी मदत करणे हे उद्दीष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात दरमहा रु.1500/- इतकी रक्कम डिबीटी व्दारे प्राप्त होणार असल्याची माहिती देत शासनाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीम.ज्योती पाटील यांनी या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या, निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना घेता येईल असे सांगितले. याकरिता ती महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असून तिचे वय किमान 21 वर्ष व कमाल 65 वर्ष असणे आवश्यक आहे. लाभार्थी महिलेचे स्वत:चे आधार लिेंक असलेले बॅंक खाते असणे आवश्यक असून लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.2.5 लाखापेक्षा जास्त नसावे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

या योजनेचे अर्ज पोर्टल किंवा नारीशक्ती दूत ॲपव्दारे अथवा सेतू सुविधा केंद्राव्दारे भरता येतील. पात्र महिला ऑनलाईन नारीशक्ती दूत ॲपव्दारे स्वत: अर्ज भरु शकते, अथवा जी महिला ऑनलाईन अर्ज करु शकत नसेल त्या महिलांसाठी अर्ज भरण्याची सुविधा नवी मुंबई महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयातील विशेष नोंदणी कक्षात महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच अंगणवाडयांमध्येही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी दिली. यावेळी त्यांनी उपस्थित नमुंमपा अधिकारी, कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांच्याशी संवाद साधत योजनेच्या अंमलबजावणीविषयी व कार्यप्रणालीविषयी त्यांच्या मनातील शंकांचे निरसन केले.

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेचा लाभ पात्र महिलांना सुलभतेने घेता यावा याकरिता आवश्यक कागदपत्रेही महिलांना सहज उपलब्ध होतील अशी ठेवण्यात आलेली असून यामध्ये आधार कार्ड तसेच अधिवास प्रमाणपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला सादर करावयाचा आहे. अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर महिलेचे 15 वर्षापूर्वीचे रेशनकार्ड / मतदार ओळखपत्र / जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे अनिवार्य राहील.

महिलेचा जन्म परराज्यातील असल्यास तिने पतीचे जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र सादर करावयाचे आहे. याशिवाय रु. 2.5 लाखापर्यंतचे उत्पन्न प्रमाणपत्र अथवा पिवळे / केशरी रेशनकार्ड सादर करावयाचे आहे. त्याचप्रमाणे अर्जदाराचे हमीपत्र सादर करावयाचे असून आधार लिंक असलेले बँक पासबुकही सादर करावयाचे आहे. तसेच अर्जदाराचा फोटो अपलोड करावयाचा असून स्वत: लाभार्थी महिला उपस्थित असणे आवश्यक असणार आहे.

अशी विविध प्रकारची उपयुक्त माहिती प्रशिक्षण कार्यक्रमात देण्यात आली व जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण” योजनेची माहिती पोहचवून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही अशाप्रकारे काम करण्याचे सूचित करण्यात आले. समाजविकास विभागाचे सहा.आयुक्त श्री.प्रबोधन मवाडे यांनी आभार मानले.

by Team Nirbhid Vartamaan

Exit mobile version