मुलांच्या जडणघडणीत पालकांची सजग भूमिका महत्त्वाची.! – प्रा. रुपेश पाटील
'मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका' या विषयावर व्याख्यान संपन्न
कणकवली दि. 21 निर्भीड वर्तमान:– विद्यार्थी हे दिवसभरात केवळ सहा ते सात तास शाळेत असतात. या शालेय वातावरणात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर विविध प्रकारचे संस्कार दिले जातात. मात्र त्यानंतर खऱ्या अर्थाने मुलांवर योग्य ती पालन-पोषणाची जबाबदारी पालकांचीही आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी नांदगाव असलदे येथील क्रमांक चार शाळेच्या स्नेहसंमेलन प्रसंगी आयोजित व्याख्यानात केले आहे.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रा. रुपेश पाटील यांचे ‘मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका’ या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.
आपल्या व्याख्यानात बोलताना प्रा. पाटील पुढे म्हणाले की, अलीकडे मुलं आपल्या पालकांना भावनिक दृष्ट्या काहीसे दबाव टाकून त्यांच्याकडून आपल्याला हवी ती वस्तू किंवा त्यांना हवी ती बाब मिळवून घेतात, अशा वेळी पालकांनी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय न घेता मुलांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काय योग्य व काय अयोग्य आहे? याची जाणीव ठेवावी. कारण पालकांचा एक निर्णय चुकला तर मुलांच्या संपूर्ण भविष्याची राख रांगोळी सुद्धा होऊ शकते. म्हणून अलीकडे पालकांनी सजग राहून आपल्या मुलांना योग्यरित्या हाताळल्यास मुलं यशस्वी होऊ शकतात, असे सांगत प्रा. रुपेश पाटील यांनी अलीकडे सोशल मीडियावर मुलं कशी अभिव्यक्त होतात, हे उदाहरणाद्वारे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इमाम नावलेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका सौ. सामंत मॅडम यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहाय्यक शिक्षिका कुडतरकर मॅडम यांनी केले.
दरम्यान यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध कलागुण दर्शन कार्यक्रमाने स्नेहसंमेलनात रंगत आणली. यात बालकांनी नृत्य, नाट्यछटा सादर केल्या. तसेच तसेच विविध वेशभूषा परिधान करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमास पालकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.