ताज्या घडामोडीमहाराष्ट्रसामाजिक

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार २०२२ जाहीर..!!

12 मार्च 2023, रोजी खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार पुरस्कार..!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कार विजेत्यांची यादी चव्हाण सेंटरच्या युवा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.

या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे कार्याध्यक्ष खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आह. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.

यंदाचा २०२२ सालचा युवा क्रीडा पुरस्कार हर्षदा गरुड(वेट लिफ्टिंग), रुद्राक्ष पाटील (नेमबाजी) यांना जाहीर झाला आहे.

सामाजिक युवा पुरस्कारात सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हेमलता पाडवी (नंदूरबार) व प्रवीण निकम (पुणे) यांची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राला कला-साहित्याची मोठी परंपरा आहे. अनेक कलांचे उगमस्थान असलेल्या या भूमीतील रंगमंचीय कलाविष्कार (परफॉर्मिंग आर्ट्स) सादर करणाऱ्या युवांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामध्ये नृत्य विभागात मुग्धा डिसोजा (पुणे), लोककला विभागात सुमित धुमाळ, गोंधळ (औरंगाबाद) आणि महेश खंदारे, नाट्यविभाग यांना जाहीर झाला आहे.

मराठी भाषेत मागील पाच वर्षांत साहित्यकृतींचे लिखाण करणाऱ्या युवक व युवतींना साहित्य युवा पुरस्कार २०२२ देऊन गौरव करण्यात येत आहे. या पुरस्कारांमध्ये पुण्याच्या अमृता देसर्डां (पुस्तक : आत आत आत) व अमरावती येथील पवन नालट (पुस्तक : मी संदर्भ पोखरतोय) यांची निवड करण्यात आली आहे.

आपल्या उद्योगाच्या माध्यमातून कमीत कमी पाच वर्षांत यशस्वीपणे आपला उद्योग चालवत,त्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत,पर्यावरणीय समतोल व शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्योग धंद्यात विविध प्रयोग करीत तसेच रोजगाराची निर्मिती करीत आपल्या भागात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या अनिता माळगे (सोलापूर) आणि अनिश सहस्त्रबुद्धे (सोलापूर) या युवा उद्योजकांना ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा उद्योजकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

यावर्षीपासून युवा पत्रकारिता पुरस्कार आणि इनोवेशन युवा पुरस्कार दोन विभागांमध्ये नव्याने पुरस्कार देण्यात येणार आहेत. पत्रकारिता युवा पुरस्कारात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शर्मिष्ठा भोसले (मुंबई) व मुस्तान मिर्झा (उस्मानाबाद) यांची निवड करण्यात आली आहे. तसेच इनोव्हेशन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिव्यप्रभा भोसले (पुणे), सारंग नेरकर (ठाणे) आणि सुमित पाटील (मुंबई) यांना पहिला युवा इनोव्हेटर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!