राज्यातील धनगर, मेंढपाळ समाजाच्या समस्या सोडवणे व विकासयोजनांसाठी झाली बैठक..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- राज्यातील धनगर, मेंढपाळ समाजाच्या समस्या सोडवणं तसंच विकासयोजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक पार पडली आहे. धनगर, मेंढपाळ बांधवांची फिरस्ती थांबवून त्यांच्या जीवनात काळानुरुप सुधारणा केली पाहिजे. त्या अनुषंगानं मेंढ्यांच्या पालन-पोषणासाठी चराईक्षेत्रालगतची जमीन अर्धबंदिस्त निवाऱ्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास मेंढपाळ, धनगर बांधवांच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी उत्पन्नाचा शाश्वत स्रोत निर्माण होऊ शकेल. यादृष्टीनं पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागानं आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.
मेंढपाळ समाज वर्षोनुवर्षे भटकंतीचं जीवन जगत आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे. ज्याप्रमाणे शेळी, कुक्कुटपालनाच्या योजना राबवल्या जातात, त्याच धर्तीवर मेंढ्यासाठी अर्धबंदिस्त निवारा उपलब्ध केल्यास धनगर बांधवांची फिरस्ती थांबेल. यापुढच्या काळात धनगर बांधवांच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्या लागतील.
वाढत्या शहरीकरणामुळे गायरान जमिनी, चराऊ कुरणे आदी क्षेत्र कमी होऊ लागलं आहे. चराई क्षेत्राची कमतरता ही धनगर समाजाची मोठी समस्या आहे. पावसाळ्यात शेतात पिकं असतात आणि चारा उपलब्ध नसतो. अशा परिस्थितीत मेंढ्यांसाठी अर्धबंदिस्त निवाऱ्याची व्यवस्था प्रायोगिक तत्वावर उपलब्ध करुन दिल्यास अनेक प्रश्न सुटू शकतील. अर्धबंदिस्त निवाऱ्यामुळे मेंढ्यांचं आरोग्य सुधारून त्यांचं वजन वाढेल. मेंढ्यांच्या उत्तम संकरीत जाती निर्माण करणं शक्य होईल. यादृष्टीनं विचार करण्यात यावा. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी सांगितले आहे.