राष्ट्रीय युवा दिनानिमित्त आयोजित मोटारसायकल रॅलीस पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!!
जी 20 गटाचे अध्यक्षपद ही भारतासाठी मोठी संधी - डॉ.शैलेंद्र देवळाणकर
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- गेल्या काही वर्षात भारतामध्ये डिजिटल क्रांती घडून आली असून अशा वेळी जी 20 सारख्या संघटनेचे अध्यक्षपद भारताकडे येणे फार महत्वपूर्ण असल्याचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉ शैलेंद्र देवळाणकर यांनी आज पुण्यात बोलताना सांगितले.
पुण्यात होत असलेल्या जी 20 परिषद बैठकीच्या जनजागृतीसाठी आणि राजमाता जिजाऊ त्याचबरोबर स्वामी विवेकानंद जयंतीनमित्त आज भव्य मोटारसायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते . या रॅली चा समारोप सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झाला . यावेळी भारताचे जी 20 अध्यक्षपद , संधी ,आव्हाने आणि युवकांची भूमिका या विषयावर श्री देवळाणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आपल्या देशातील युवकांमुळे देशाची ही प्रगती झाली असून स्टार्ट अप, मेक इन् इंडिया, आत्मनिर्भर भारत यासारख्या योजना यशस्वी होत असल्याचे श्री देवळाणकर यावेळी म्हणाले . भारताची प्रगती दाखवण्याचे जी 20 हे प्रमुख माध्यम असून या संघटनेचे अध्यक्ष पद ही भारताला मिळालेली एक मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले .
21 व्या शतकात भारत जागतिक महासत्ता बनणार असून देशातील प्रत्येक युवक या देशाचा राजदूत बनला पाहिजे , त्यासाठी तरुणांनी आपली स्वप्ने देशाच्या विकासाशी जोडली पाहिजेत असे आवाहन देवळाणकर यांनी यावेळी केले . जागतिक पातळीवरील अनेक महत्वाच्या संघटनांना जी २० देशांची ही संघटना महत्व पूर्ण निर्देश देत असून संपूर्ण जग त्यांचे पालन करीत असल्याने या संघटनेचे अध्यक्ष पद भारताकडे येणे ही फार मोलाची गोष्ट असल्याचे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी केले तर प्र कुलगुरू संजीव सोनवणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे , उपायुक्त संतोष वारुळे यांच्यासह विद्यापीठ अधिसभेचे सदस्य उपस्थित होते .
तत्पूर्वी आज सकाळी पुण्यातील ऐतिहासिक लाल महाला मध्ये राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जनजागृती रॅलीला प्रारंभ झाला . पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार , विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . कारभारी काळे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते . बाईक रॅली मध्ये शहरातील तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी झाली होती .सर्वसामान्य पुणेकरांनी देखील रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून या रॅली ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.