मुंबई, निर्भीड वर्तमान:- केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) ग्लोबल ऑपरेशन सेंटरने इंटरपोल एनसीबी –अबू धाबी, केरळ पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अबुधाबीमधील भारतीय दूतावासाशी समन्वय साधत रेड नोटिशींची अंमलबजावणी करत दोन आरोपींना भारतात आणले आहे. सीबीआयने त्यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून बारकाईने पाठपुरावा केला होता.
पीरू मोहम्मद याह्या खान
त्यापैकी पीरू मोहम्मद याह्या खान या आरोपीला भारतातील केरळ पोलिसांकडे सोपवण्यात आले. कोट्टायम येथील पाला पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक 403/2008 साठी तो पोलिसांना हवा होता. केरळमध्ये अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याअंतर्गत आणि बलात्कार असे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. केरळ पोलिसांच्या विनंतीवरून सीबीआयला 10 जानेवारी 2024 रोजी इंटरपोल महासचिवालयाकडून या संदर्भात रेड नोटीस मिळाली होती. सर्व इंटरपोल सदस्य देशांना आरोपीचे स्थान कळविण्यात आले होते आणि अटक करण्यासाठी रेड नोटीस पाठवण्यात आली होती. इंटरपोल-अबू धाबीच्या समन्वयाने केरळ पोलिसांच्या पथकाने त्याला भारतात आणले.सुभाष विठ्ठल पुजारी
त्याचबरोबर सीबीआयच्या ग्लोबल ऑपरेशन सेंटरने सुभाष विठ्ठल पुजारीला चीनमधून भारतात आणण्यासाठी मुंबई पोलीस आणि परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय साधला. मुंबई पोलिसांच्या पथकाने त्याला परत आणले आहे. मुंबई पोलिसांना अनेक गुन्ह्यांप्रकरणी तो हवा होता. विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हे क्रमांक 244/07 व 286/09 तर गुन्हे प्रकटीकरण कक्ष (डीसीबी), गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) गुन्हे क्रमांक 154/2009 साठी तो हवा होता. खुनाचा प्रयत्न, खंडणी, गुन्हेगारी धमकी, शस्त्रास्त्र कायद्याचे उल्लंघन आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्या अंतर्गत (मकोका) त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. सीबीआयला 14 फेब्रुवारी 2012 रोजी इंटरपोल महासचिवालयाकडून या संदर्भात रेड नोटीस जारी करण्यात आली होती.