रेतीचोरीचा अहवाल सादर मात्र कारवाई थंड बस्त्यात तत्कालीन व विद्यमान तहसीलदारांकडून कर्तव्यात कसूर..!!
मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर झाली प्रशासकीय कारवाई..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- खडकपूर्णा नदी पात्रातून दररोज शेकडो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन व वाहतुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, प्रशासकीय अनियमित्ता केल्याबाबतची नोंद संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तकात घेण्याची शिफारस उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांनी केली, दरम्यान चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या विद्यमान व तत्कालीन तहसीलदार यांच्यावर प्रशासकीय कारवाई बाबतचा शिफारस अहवाल देऊन सहा महिने उलटले तरीही कर्तव्यात कसुर व अनियमिततेच्या सदर प्रकरणात प्रशासकीय कारवाई अद्याप थंडबस्त्यात आहे. केवळ मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर प्रशासकीय कारवाई झाली मात्र प्रमुख अधिकारी यांना वरिष्ठांकडून अभय मिळत असल्याने जिल्हा प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
तालुक्यातील निमगाव वायाळ, साठेगाव सावंगी,नारायण खेड, देऊळगाव मही,दिग्रस बुद्रुक, टाकरखेडा भागिले या रेतीघाटावर खडकपूर्णा नदी पात्रातून होत असलेल्या अवैध रेती उत्खनन व वाहतुकीबाबत महाराष्ट्र शासन युवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी अडीच वर्षांपूर्वी तक्रार शासनाकडे केली होती त्या अनुषगाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक गौखणी १०/१०२१ प्र.क्र ८२/ ख -२ मंत्रालय मुंबई दिनांक २८ जानेवारी २०२२ मधील प्रकरण क्रमांक ९ क च्या तरतुदीनुसार प्रशासकीय व आर्थिक अनियमितता झाल्याची तक्रार नोंदविली होती.दरम्यान आपल्या आर्थिक फायद्यासाठी दरमहा शासनाचा लाखोंचा महसूल बुडवून आर्थिक अनियमितता निष्पन्न झाल्याने संबंधिताविरुद्ध अप्पर जिल्हाधिकारी (आस्थापना विभाग) जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या कडे संबंधितावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.असे असले तरी केवळ मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर थातूरमातूर कारवाई करून जिल्हा प्रशासनाने सदर प्रकरण थंड बस्त्यात टाकले आहे.उपविभागीय अधिकारी यांच्या अहवालानुसार सदर प्रकरणात तत्कालीन व विद्यमान महसूल अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई होणे क्रमप्राप्त होते, दरम्यान लाखोंच्या अवैध गौण खनिज चोरी प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात दोषी ठरलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करा अशी मागणी अनेक निवेदनाद्वारे चंद्रकांत खरात यांनी करून सातत्याने प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. याबरोबरच अवैध गौण खनिज कारवाई कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष व प्रशासकीय अनियमित्ता केल्याबाबतची नोंद संबंधित अधिकाऱ्यांच्या सेवा पुस्तकात घेण्याची शिफारस सिंदखेडराजा उपविभागीय अधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केली होती.
तरीही अवैध गौण खनिज चोरी प्रकरणात प्रदीर्घ कालावधीपासून संबंधितावर कारवाईसाठी विलंब करण्यात येत आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार,तसेच कारवाईला विलंब करून जिल्हा प्रशासन संबंधितांना पाठीशी तर घालत नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
असा आहे अहवाल –
उपविभागीय अधिकारी सिंदखेडराजा यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेल्या चौकशी अहवालात खडकपूर्णा नदी पात्रातून अवैध गौण खनिज मोजमाप व तपासणीमध्ये मौजे देऊळगाव मही, टाकरखेड भागिले या ठिकाणच्या नदीपात्रातून अंदाजे १३०० ब्रास रेतीचे उत्खनन झाले,तर निमगाव गुरु,नारायणखेड टाकरखेड भागिले येथील नदीपात्रातून अंदाजे १२ हजार ब्रास अवैध रेती उत्खनन असे एकूण १३ हजार ३०० ब्रास अवैध वाळूचे उत्खनन झाल्याची चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात नमूद केलेले आहे. सदर अहवालात संबंधित तहसीलदारांनी अवैद्य गौण खनिज कारवाईकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष व अपहार केल्याची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात घेण्याबद्दल शिफारस केली आहे.