आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लम्पी चर्म रोग प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलनासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- लम्पी चर्म रोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्राण्यामधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 आणि महाराष्ट्र शासन अधिसूचना दि. 17 जून 2022 अन्वये प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून पुढीलप्रमाणे आदेश दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात लम्पी चर्मरोगावर नियंत्रण, प्रतिबंध किंवा त्याचे निर्मुलन करता येईल आणि गोजातीय प्रजातीची सर्व गुरे म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात, त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्र बाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आण करण्यास मनाई करण्यात येत आहे. यापूर्वी शर्यतीला परवानगी दिली असल्यास या आदेशान्वये सदर शर्यत परवानग्या रद्द होतील. गोजातीय प्रजातीची गुरे व म्हशीचा कोणताही बाजार भरवणे, प्राण्याच्या शर्यत लावणे, बैल गाडी शर्यत आयोजित करणे, प्राण्यांची जत्रा भरवणे, प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे आणि नियंत्रित क्षेत्रात गोजातीय प्रजातींच्या प्राण्यांचे गट करून किंवा त्यांना एकत्रित करून कोणताही कार्यक्रम पार पाडणे यास मनाई करण्यात येत आहे. नियंत्रित क्षेत्रामधील बाजार पेठेत, जत्रेत, प्रदर्शन किंवा प्राण्यांच्या अन्य जमाव मध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गोजातीय प्रजाती प्राण्यांच्या उक्त बाधित झालेल्या गुरांना व म्हशींना आणणे किंवा आणण्याचा प्रयत्न करणे यास मनाई करण्यात येत आहे. जनावारांचा बाजार भरविण्यास मनाई करण्यात येत आहे. साथीच्या काळात बाधीत भागातील जनावरे व मानवाचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधीत करण्यात येत आहे. तसेच बाधीत गांवामध्ये बाधीत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याकरिता व चराई करिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी.

रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रा मधून पशुधनाची ऑनलाईन पध्दतीने होणारी खरेदी विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे. गायी व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधीत व अबाधीत जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त जनावरांचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पध्दतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी. बाधीत परिसरात स्वच्छता व निर्जंतूक द्रावणाची फवारणी करुन निर्जंतूकीकरण करावे व रोगप्रसारास कारणीभूत असलेल्या डास, माशा, गोचीड इत्यादीच्या नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करावी. लंम्पी चर्मरोगाचा विषाणू वीर्यामधूनही बाहेर पडत असल्यामुळे वीर्य मात्रा बनविणाऱ्या संस्था मार्फत होणारे वीर्य संकलन थांबवावे व वळुंची चाचणी करुन रोगाकरिता नकारार्थी आलेल्या वळुंचे वीर्य संकलन करणे किंवा नैसर्गिक संयोगा करिता वापर करावा. लंम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व प्रसार थांबविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपरिषदा व महानगरपालिका यांचे मार्फत त्यांचे कार्यक्षेत्रातील भटक्या पशुधनाचे नियमित निरिक्षण करण्यात यावे तसेच बाधीत पशुधनाची काळजी घ्यावी व कीटक नाशक फवारणी मोहीम स्वरुपात राबविण्यात यावी.

कायद्याशी सुसंगत कृती न करणाऱ्या आणि कायद्याच्या अंमलबजावणी मध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या पशुपालक, व्यक्ती, संस्था प्रतिनिधी यांच्या विरुध्द नियमानुसार गुन्हा दाखल करणे तसेच कारवाई प्रस्तावीत करण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील पशुधन विकास अधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

पशुधनामध्ये लम्पी चर्म रोगाची लागण झाल्याचे रोग निदान अहवाल प्राप्त झालेले आहेत. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री यांनी व्ही.सी व्दारे लम्पी चर्मरोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी नियंत्रित क्षेत्र घोषित करणे व जनावरांचे बाजार बंद करण्याबाबत सूचित केले आहे. लम्पी चर्मरोग जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती सभेमध्ये लम्पी चर्मरोगाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे या निष्कर्षापर्यंत आलेली आहे. तसेच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, एका जिल्ह्यातून दुसऱ्या बाधित जिल्ह्यात जनावरांची वाहतूक केल्यामुळे बाधित जनावरापासून निरोगी जनावरांना या रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. हा रोग विषाणूजण्य सांसर्गिक रोग असल्याने या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी लम्पी चर्म रोग या अनुसूचित रोगाचा प्रतिबंध, नियंत्रण, निर्मुलन करण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी आदेश जारी केले आहेत.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!