लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने केली आहे जाहिरातबाजी – अजितदादा पवार
वर्तमान टाइम्स | वृत्तसेवा :- जाहिरातींचा खर्च आता ५५ कोटी नाही, तर १०० कोटी रुपयांवर जाणार आहे कारण सध्या सत्ताधाऱ्यांकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत. लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरू आहे, असा थेट हल्लाबोल विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला. सरकारने जर वेगवेगळ्या योजना आणि त्या योजनांबद्दल जाहिरात करून लोकांना जागृत केले असते तर समजू शकतो. आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही अशी जाहिरातबाजी केली नाही. आम्ही निवडून आलो त्यावेळीही जाहिराती केल्या नाहीत, असेही अजितदादा म्हणाले.
आज केंद्र व राज्य सरकार तुमच्या ताब्यात आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांची नावे घेण्यापेक्षा पोलिसांनी दंगल कुणी घडवली ते शोधून काढावे. यामागे कोण सूत्रधार आहे ते समोर येऊ दे आणि जो कुणी दोषी असेल त्याला कडक शासन केले पाहिजे. अजिबात कुणाचा मुलाहिजा बाळगू नका, पण त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ देऊ नका, असेही अजितदादांनी ठणकावून सांगितले.
शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची मदत मिळाली नाही, पीक विम्याची रक्कम मिळाली नाही आणि नियमित परतफेड करणार्या तमाम शेतकऱ्यांना ५० हजार रुपये मिळायला हवे होते ते काही प्रमाणातच काहींना मिळाले आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये आणि बजेटमध्ये ही रक्कम घेतली आहे. त्यातून मंजूर करून देतील. त्यामुळे अंमलबजावणीसाठी थोडा वेळ सरकारला द्यावा लागेल. थोडी वाट बघू आणि नाही झाले तर मग आम्ही आमची भूमिका मांडू, असे अजितदादांनी स्पष्ट केले.
आता सध्या जे सुरू त्याचे एकमेव कारण म्हणजे महागाई आटोक्यात आणता येत नाही, बेरोजगारी कमी करता येत नाही. उद्योगधंदे आणण्यासाठी जे पोषक वातावरण तयार व्हायला हवे ते होत नाही. कायदा व सुव्यवस्था आटोक्यात आणली जात नाही. महिला, मुली, भगिनींवर अन्याय, अत्याचार होत आहेत. पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला आहे. ही मोगलाई आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी सरकारला केला.
केंद्रात, राज्यात सत्ता आहे मग कुठल्या वेळेची वाट बघताय? सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुहूर्त बघताय का? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अजूनही खूप मोठ्या व्यक्ती आहेत, महापुरुष आहेत त्यांना भारतरत्न मिळायचा बाकी आहे. त्यात सावरकर आहेत. गौरवयात्रा काढता मग माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि भाजपचे मंत्री, प्रवक्ते आमदार यांनी इतर महापुरुषांबद्दल वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्ये केली त्यावेळी त्यांना का थांबवण्यात आले नाही? त्या महापुरुषांबद्दल का गौरवयात्रा काढण्यात आल्या नाहीत? हे निव्वळ राजकारण आहे अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.