विठ्ठलराव सहकारी शिंदे साखर कारखान्यातून सोडले जात आहे विषारी, रासायनिक पाणी
विठ्ठलराव सहकारी शिंदे साखर कारखान्यातील विषारी, रासायनिक पाणी तात्काळ बंद करून कारखान्याविरोधात कारवाईची मागणी
सोलापुर दि 22. निर्भिड वर्तमान:- सोलापूर जिल्हातील अंबड (ता.माढा) गावच्या हद्दीत गट नंबर 88 मध्ये विठ्ठलराव सहकारी शिंदे साखर कारखाना (Sugar Factory) पिंपळनेर या कारखान्यामधून मळीचे अत्यंत विषारी असे जलप्रदूषण, भूमी प्रदूषण, भूअंतर्गत पाणी प्रदूषण करणारे मानवी आरोग्यास तसेच प्राण्यांच्या आरोग्यास अत्यंत घातक असे पाणी मोठ्या पाईपलाईनद्वारे बेकायदेशीररित्या मागील एक वर्षापासून निरंतरपणे सोडण्यात येत आहे.
कारखान्यामधून मळीचे अत्यंत विषारी म्हणजे मनुष्यांपासुन प्रत्येक प्राणीमात्रांच्या आरोग्यास अत्यंत घातक ठरणारे असे पाणी मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या सोडण्यात येत आहे. त्यामुळे अर्धा ते एक किलोमीटर परिसरातील विहिरींचे पाणी पिण्यास अयोग्य झालेले आहेत. तर परिसरात उग्र असा वास येत असुन शेतकऱ्यांच्या सह जनावरांच्या पिण्याचे पाणी बाहेरून आणावे लागत आहे.
अंबड ग्रामपंचायत मार्फत पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी विहीर घ्यायच्या होत्या ज्या जागी विहीर घ्यायची होती त्या परिसरामधील पाणी परीक्षण करण्यात आले होते परंतु पाणी परीक्षण केलेल्या सर्व ठिकाणच्या भूजल स्रोतातील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल शासकीय पाणी परीक्षन अधिकाऱ्याकडून देण्यात आला आहे. या कारणास्तव ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे नियोजित ठिकाण बदलावे लागलेले आहे.
या सर्व प्रकरणाची तात्काळ गांभीर्यपूर्वक दखल घेऊन कारखान्यातून जे विषारी पाणी सोडले जात आहे ते पंधरा दिवसाच्या आत बंद करून कारखान्या(Sugar Factory) विरोधात तात्काळ गुन्हे दाखल करावे व परिसरात झालेली नुकसान भरपाई कारखान्याकडून घ्यावी अशी मागणी लेखी निवेदना मार्फत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख गणेश घुगे यांनी केली आहे.
जर पुढील पंधरा दिवसांत ठोस कारवाई करण्यात आली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)पक्षा वतीने दि. 06-02-2024 रोजी पासुन मा. उपप्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले जाणार आहे असा ईशारा गणेश घुगे यांनी निवेदनामार्फत दिला आहे.