शाजी के व्ही यांनी नाबार्डचे अध्यक्ष म्हणून स्वीकारला पदभार..!!
नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड)
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- शाजी के व्ही नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) चे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे. याआधी, ते 21 मे 2020 पासून नाबार्डचे उपव्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. शाजी यांनी सॉफ्टवेअर आधारित पर्यवेक्षण आणि तपासणी, डेटा-वेअरहाऊस, प्रक्रिया पुनर्अभियांत्रिकी आणि जोखीम व्यवस्थापन पद्धतींमध्ये सुधारणा यासह प्राथमिक कृषी सहकारी संस्था (PACS) संगणकीकृत करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची संकल्पना यासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी नाबार्डच्या पुनर्वित्त विभागाचेही नेतृत्व केले. त्यांच्या नेतृत्वाखाली नाबार्डच्या पुनर्वित्त विभागाने आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये सर्वकालीन उच्च व्यवसाय पातळी नोंदवली आणि बाजारातून उभारलेल्या संसाधनांचा कार्यक्षम वापर तसेच त्यांच्या न्याय्य उपयोजनाची अंमलबजावणी केली.
नाबार्डमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी कॅनरा बँकेत 26 वर्षे विविध पदांवर काम केले. यापैकी शेवटची जबाबदारी म्हणून, ते कॅनरा बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयात स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आणि बिझनेस डेव्हलपमेंटचे प्रभारी होते. या काळात सिंडिकेट बँकेच्या कॅनरा बँकेत विलीनीकरणाचा प्रकल्प त्यांनी यशस्वीपणे हाताळला.
कृषी मूल्य साखळी वित्तविषयक कार्यगट, RRB साठी भविष्यातील आराखडा सुचविणारी तज्ज्ञ समिती, सोशल स्टॉक एक्स्चेंजवरील तांत्रिक गट, RRB द्वारे IPO साठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणारी समिती, एटीएमच्या कॉस्ट शेअरिंग वरील समिती सारख्या अनेक राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ समित्यांचे/ कार्यकारी गटांचे शाजी सदस्य आहेत.
शाजी हे कृषी विषयातील पदव्युत्तर पदवीधर आहेत आणि त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), अहमदाबाद येथून सार्वजनिक धोरणात PGDM सोबत ट्रेझरी, इन्व्हेस्टमेंट आणि रिस्क मॅनेजमेंट या विषयात डिप्लोमा केला आहे. ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्सचे प्रमाणित सहकारी आणि NSE प्रमाणित मार्केट प्रोफेशनल (NCMP) देखील आहेत.