शिवाजी महाराजांचे किल्ले कोणत्या दिशेला आणि किती मैलावर सांगणारे स्मारक माहिती आहे का ?
पुणे, निर्भीड वर्तमान:- शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पाया घातला, त्या घटनेला तीनशे वर्षे पूर्ण झाली म्हणून 1945 मध्ये भोरकर सचिवांनी एक स्मारक स्तंभ उभा केला होता.
हा स्मारक स्तंभ आजच्या पुणे-बेंगलोर हायवे येथील नसरापूर, शिवापूर गावाच्या जवळ कोल्हापूरच्या दिशेने जाताना पुढे आल्यानंतर एका ठिकाणी रस्त्याच्या डाव्या बाजूला आहे. स्मारक छोटेखानी असले तरी ते कसे देखणे आणि माहितीपूर्ण असावे याचा उत्तम नमुना म्हणून या स्मारकाकडे बघता येईल.
या स्मारकाची रचना करताना या स्मारकस्तंभाच्या भोवती शिवाजी महाराजांनी ज्या ज्या किल्ल्यांच्या आधारावर स्वराज्याची उभारणी केली ते किल्ले म्हणजे राजगड, तोरणा, सिंहगड, तुंग, तिकोना, रोहिडा इ. किल्ले हे त्या स्मारकाच्या कोणत्या दिशेला आणि किती मैलावर आहेत, हे त्या स्मारकाच्या खालच्या चौथऱ्यावर संगमरवरामध्ये कोरलेले आहे.
या स्मारक स्तंभावरच शिवाजी महाराज हे स्वराज्यातील मावळ्यांचे संघटन करत असतानाचे संगमरवरातील सुंदर शिल्प कोरलेले आहे. पण काही लोक या शिल्पाची पूजा करून त्याला हळदकुंकू सुद्धा लावतात. कुंकूमध्ये असलेल्या ऍसिड मुळे ते शिल्प खराब होऊ शकते याची नोंद सुद्धा या पूजा करणाऱ्यांनी घेतली पाहिजे.
शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी आणि जाज्वल्य इतिहासातून प्रेरणा घ्यावी म्हणून बनविण्यात आलेलं हे स्मारक अजूनही चांगल्या स्थितीत आहे ,पण या स्मारकाची देखभाल करणे सुद्धा खूप गरजेचे आहे.
या स्मारकाच्या शेजारी शिवाजी महाराजांच्या नावानेच एक शाळा आणि कॉलेज आहे. या शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी, स्टाफने आणि संचालकांनी जर ठरवलं तर शिवाजी महाराजांच्या या देखण्या स्मारक स्तंभाचे चांगल्या स्थितीत जतन आणि संवर्धन होईल आणि त्याचबरोबर पुण्यावरून कोल्हापूरला जाणाऱ्या लोकांसमोर शिवाजी महाराजांचा इतिहास जगवणारा एक वेगळा पैलू येईल.
पोस्ट, इंद्रजीत सावंत सर