संरक्षण दलातील निवृत्तीवेतनधारकांनी 20 फेब्रुवारी, पर्यंत वार्षिक ओळख प्रक्रिया पूर्ण करावी..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- सिस्टम फॉर पेन्शन अॅडमिनिस्ट्रेशन (रक्षा) किंवा स्पर्शद्वारे पेन्शन घेणार्या सर्व संरक्षण निवृत्ती वेतधारकांना 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत वार्षिक ओळख प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती संरक्षण मंत्रालयाने केली आहे. मासिक निवृत्तीवेतन( पेन्शन) सुरू राहण्यासाटी आणि वेळेवर जमा होण्यासाठी वार्षिक ओळख/जीवन प्रमाणपत्र प्रक्रिया ही एक वैधानिक आवश्यकता आहे.
संरक्षणं मंत्रालयाने जे बँक पेन्शनधारक स्पर्शमधे समाविष्ट झाले होते आणि त्यांची ओळख प्रक्रिया नोव्हेंबर 2022 पूर्ण झाली नव्हती, त्यांच्या पेन्शन पेमेंटला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यास मान्यता दिली होती. संरक्षण लेखा विभागाकडे सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, तीन लाख नव्वद हजार तीनशे साठ- (3,19,366) संरक्षण निवृत्तीवेतनधारकांनी स्पर्शद्वारे पेन्शन घेताना वार्षिक ओळख प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही. अशा पेन्शनधारकांनी अंतिम मुदतीपूर्वी वार्षिक ओळख/जीवन प्रमाणपत्र घेण्याची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
स्पर्श ही पेन्शन दाव्यांवर प्रक्रिया करणारी आणि कोणत्याही बाह्य मध्यस्थाशिवाय संरक्षण निवृत्तीवेतनधारकांच्या बँक खात्यांमध्ये थेट पेन्शन जमा करणारी वेब-आधारित प्रणाली आहे. सशस्त्र दलांचे पेन्शन, मंजुरी आणि वितरणाची संरक्षण दलाची गरज भागविण्यासाठी संरक्षण मंत्रालय ही प्रणाली लागू करत आहे. ही एक केंद्रीकृत मंजुरी, दावा आणि पेन्शन वितरण प्रणाली आहे. यात स्व पडताळणीद्वारे माहितीचे प्रमाणीकरण सहज होते आणि त्यात सुधारणाही करता येतात. त्यामुळे अचूकतेची हमी तर मिळतेच पण पहिल्याच वेळी योग्य डेटा तयार होतो. या प्रणालीत पेन्शनधारकांच्या ओळख प्रमाणपत्रासाठी डिजिटल प्रक्रियेचा वापर केला जातो त्यामळे निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन कार्यालयांत वारंवार जाण्याची गरज उरत नाही.