ताज्या घडामोडी

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि 16 ( निर्भीड वर्तमान ):- पुण्यातील स्पार्कल कँडल तयार करण्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड, पुणे महानगरपालिका या ठिकाणच्या 75 हजार औद्योगिक मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू केले असून राज्यातील इतरही महानगरपालिकांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्वेक्षण करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले आहे.

नियम 97 अन्वये अल्पकालीन चर्चा श्रीमती उमा खापरे यांनी उपस्थित केली होती. यावेळी सर्वश्री सचिन अहिर, भाई जगताप यांनी सहभाग घेतला होता. यावेळी श्री. फडणवीस बोलत होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, “पुणे जिल्ह्यातील तळवडे येथील मे. राणा इंजिनियरिंग, ज्योतिबा नगर येथे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याच्या कारखान्यात 8 डिसेंबर, 2023 रोजी स्फोट होऊन एकूण 11 कामगार मृत्यूमुखी पडले असून या मध्ये 6 महिला कामगारांचा समावेश आहे. 10 कामगार जखमी झाले होते. या घटनेच्या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी पाहणी केली. ज्याठिकाणी दुर्घटना घडली तेथे कच्चे बांधकाम असलेल्या इमारती व एक शटर असलेल्या शेडमध्ये औद्योगिक कारखाना सुरु असल्याचे निदर्शनास आले. या कारखान्यात शोभेच्या दारुपासून वाढदिवसाकरीता वापरण्यात येणारे स्पार्कल कॅन्डल तयार करण्याचे काम सुरु होते. या ठिकाणी व्यवसाय मालकाव्दारे नियुक्त महिला कामगार काम करीत होत्या. हा व्यवसाय अवैध असून परवानगी घेतलेली नव्हती. ही जागा रेड झोनमध्ये समावीष्ट असून तळवडे परिसरात साधारणपणे 3000 विविध प्रकारच्या आस्थापना कार्यरत आहेत. या ठिकाणी कोणत्याही उपाययोजना न केल्याने ही घटना घडली. दुर्घटनेच्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड पोलीसांनी कंपनीवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपींना अटक करण्यात आली आहे. कंपनीवर कामगार कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन झाले आहे त्या संदर्भात कारवाई करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अपघात झालेल्या ठिकाणी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. धोकादायक उद्योगांवर निर्बंध टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच अशा धोकादायक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात येत असून येऊन कंपनींच्या आत व परीसरातील अवैध कामांवर निर्बंध घालण्यात येईल असेही उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!