आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेश

सातारा जिल्ह्यातील तलावाच्या गाळाने उलगडले 8664 वर्षांपूर्वीच्या हवामान आणि पर्यावरणीय बदलांचे रहस्य..!!

वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा :- महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध कास पठारावर असलेल्या तलावातील गाळाच्या नव्या अभ्यासानंतर, होलोसीन युगाच्या पूर्वार्धाच्या मध्य काळात म्हणजे आजपासून सुमारे 8664 वर्षांपूर्वी भारतातील उन्हाळी पावसाच्या पद्धतीत महत्वाचे बदल होऊन, ह्या भागात कमी पावसामुळे कोरडे हवामान कसे निर्माण झाले, याचा अंदाज बांधणे शक्य झाले आहे.

या तलावातील गाळ सुमारे 8000 वर्षांपूर्वीचा असून, त्यातून होलोसीनच्या उत्तरार्धापर्यन्त म्हणजे, सुमारे 2827 वर्षांपूर्वी, हा प्रदेश कमी पावसाचा आणि कमकूवत मोसमी पावसाचा प्रदेश बनल्याचे सूचित झाले आहे.

यूनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या पश्चिम घाटाचा भाग असलेले कास पठार, तिथे आढळणाऱ्या कासा ह्या वृक्षामुळे, या नावाने सुपरिचित आहे.

विपुल जैवविविधता असलेल्या ह्या कास पठारावर, ऑगस्ट ते सप्टेंबर या काळात, विविधरंगी रानफुलांचे ताटवे फुललेले दिसतात.

पुण्याच्या आघारकर संशोधन संस्थेने ,तिरूअनंतपुरम इथल्या पृथ्वी विज्ञान राष्ट्रीय संशोधन केंद्रासोबत या तलावातील गाळावर संशोधन आणि अध्ययन केले. कार्बन डेटिंग नुसार 8000 वर्षांपूर्वीच्या या मातीवरुन, तेव्हाच्या हवामानाच्या परिस्थितीचा अंदाज बांधता आला. त्यावरून, 8000 वर्षांपूर्वी, या तलावात मोसमी पाऊस पडत असावा आणि, साधारण 2000 वर्षांपूर्वी हा तलाव कोरडा झाला असावा, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

या अध्ययनातील निरिक्षणे असेही सांगतात की, हा मोसमी तलाव हे भू वचाची झीज होऊन तिथे तयार झालेल्या मोठ्या खड्डयामुळे विकसित झाला असावा. आजचे कास पठार याच प्राचीन तलावावर आहे.

होलोसीनच्या उत्तरार्धात (सुमारे 2827 वर्षांपूर्वी ) पर्जन्यमान कमी झाल्याचे आणि नैऋत्य मोसमी पाऊस कमकुवत झाल्याचे शास्त्रज्ञांना निरीक्षणात दिसून आले. मात्र, गेल्या 1000 वर्षांच्या काळात या तलावात मोठ्या संख्येने आढळलेले परागकण, प्लँकटोनिक आणि डायटॉम टॅक्स यामुळे ह्या तलावाचे युट्रोफिकेशन झाले म्हणजेच, तलावात नायट्रोजनसारखी पोषणमूल्ये वाढल्याचे सूचित झाले आहे. पाणलोट क्षेत्रातील गुरांचा वावर आणि मानवी प्रभावामुळे हा बदल झाला असल्याची शक्यता आहे.

या अध्ययनानुसार, कास पठारावर, होलोसीनच्या पूर्वार्धात फुलांचे ताटवे अधिक काळ म्हणजे अगदी मार्च एप्रिल पर्यन्त फुलत असावेत असा अंदाज अभ्यासकांनी वर्तवला आहे.

क्वाटरनरी सायन्स ॲडव्हान्सेस’ मध्ये प्रकाशित झालेले हे निष्कर्ष, या स्थळाच्या अमूल्य नैसर्गिक वारशाचे संरक्षण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर भर देण्याची शिफारस करणारे आहेत.

by Team Nirbhid Vartamaan

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!