४४ लाख ०८ हजारांचा खोट्या जबरी चोरीचा डाव 24 तासांत पोलीसांनी शिताफिने उधळला..!!
वर्तमान टाईम्स | वृत्तसेवा:- मुंबई मधील अंधेरी येथे वास्तव्यास असलेले आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय करत असलेले श्री अमीर मोहम्मद व्होरा, वय ३० वर्षे हे दिनांक २२/०२/२०२३ रोजी २३:३० वा.सु. आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे आले व तक्रार केली की ते त्यांच्या वडिलांसोबत त्यांच्या गाडीने भुलेश्वर येथुन त्यांच्या घरी परतत असताना १९:३० वा.सु. मॉन्टे साउथ इमारतीच्या समोर भायखळा (पश्चिम), मुंबई येथे दुचाकीवरून आलेल्या दोन इसमानी पोलीस असल्याची बतावणी करून गाडी थांबवली व त्याचा वाहन चालक परवाना तपासत असताना दुसऱ्या मोटार सायकलवरून आलेल्या त्यांच्या इतर दोन साथीदारांनी त्यांच्या गाडीमध्ये ठेवलेले ४४ लाख ०८ हजार रोख रूपये पळवुन नेले.
सदर गंभीर घटनेबाबत पोलीसांनी तात्काळ कारवाई सुरू करून त्याच्याकडे सखोल चौकशी करता त्याने असे सांगितले की, त्याच्या सासुने सदरची रक्कम दुबई येथुन आंगडीया मार्फतीने मुंबईमध्ये पाठवली होती. हि रक्कम त्याला फ्लॅट घेण्याकरीता तिने पाठवली होती. परंतू पोलीस असल्याची बतावणी करून ०४ इसमांनी त्याच्याकडुन रक्कम जबरीने चोरून नेली. तर तक्रारदार यांनी घटना घडल्यानंतर त्या चोरांचा पाठलाग केला व नातेवाईकाची वाट बघत असल्याने पोलीस ठाणेस तक्रार करण्यासाठी येण्यास विलंब झाला असल्याचे सांगितले. याबाबत, आग्रीपाडा पोलीस ठाणे यांनी त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत गु.र.क्र.९२ / २०२३ कलम ३९२, १७०, ३४१, ३४ भादवि अन्वये गुन्हा दाखल केला.
घटनेची गंभीर दखल घेत मा. पोलीस सह आयुक्त ( का व सु) श्री सत्यनाराण चौधरी, मा अपर पोलीस आयुक्त, म.प्रा.वि. श्री अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ३, श्री अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली परिमंडळ-३ च्या सहाही पोलीस ठाण्यांची पथके तयार करण्यात आली. त्यांच्या मार्फतीने तपास सुरू करून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तांत्रिक तपास केला व ख़बरींच्या मार्फतीने आरोपींची माहिती मिळवण्यासाठी पारंपारीक पध्दतीचाही अवलंब केला.
तपासा दरम्यान फिर्यादी आणि त्याचे वडिल मोहम्मद हनिफ गनी व्होरा, वय- ५७ वर्षे यांनी दिलेल्या माहितीमध्ये तफावत आढळुन आली होती. फिर्यादींनी तक्रार करण्याकरीता केलेला विलंब आणि त्यांच्यामधील विसंगतीने पोलीसांचा फिर्यादीवरील संशय वाढला. घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज प्राप्त झाल्यानंतर पोलीसांना खात्री झाली की फिर्यादी देत असलेली माहिती खोटी आहे. पोलीसांनी फिर्यादीकडे सातत्यपुर्ण व सखोल तपास करून फिर्यादीने दिलेल्या माहितीमधील तफावत पुराव्यासह फिर्यादीला दाखवुन दिल्यानंतर फिर्यादीने अखेर गुन्हा कबुल केला. पोलीसांनी नमुद गुन्हयामध्ये त्यास अटक केली आहे. त्याच्याकडुन गुन्हयात लपवुन ठेवलेले ४४,०८,०००/- ( चौवेचाळीस लाख आठ हजार) रोख रक्कम हस्तगत केलेली आहे.
अशाप्रकारे जबरी चोरीचा बनाव केलेला गुन्हा आग्रीपाडा पोलीस ठाणे यांनी कौशल्यपूर्ण तपास करून आरोपीस अटक करून गुन्हयातील मालमत्ता हस्तगत केली व गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस सह आयुक्त (का व सु) श्री सत्यनारायण चौधरी, मा. अपर पोलीस आयुक्त, मध्य प्रादेशिक विभाग श्री अनिल कुंभारे, मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-०३, श्री अकबर पठाण, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, आग्रीपाडा विभाग श्री विठ्ठल शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री योगेंद्र पाचे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि योगेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, संदीप गळंगे, संजयकुमार कांबळी, मुकेश शिरसाठ, पो.ह. मंडलीक, पो.शि.आपसुंदे, पो.शि.बोरसे, पो.शि. शिंदे, पो.शि. खरात व परिमंडळ ०३ मधील तपास पथके यांनी पार पाडली.