Baramati Loksabha : बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न
पुणे | निर्भीड वर्तमान:- बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक श्रीमती आनंदी पालानीस्वामी यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील सभागृहात संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (Randomisation) करण्यात आली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात एकूण २ हजार ५१६ मतदान केंद्र असून त्यासाठी आवश्यक ९ हजार ५८ बॅलेट युनिट, ३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि १४१ टक्के कंट्रोल युनिट, तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रीयेची माहिती देण्यात आली. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर ५ एप्रिल रोजी मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय सरमिसळनंतर बारामती लोकसभा मतदार संघासाठी ३ हजार ५६९ बॅलेट युनिट, ३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात आले आहेत.
बारामती लोकसभा संघात ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आणि नोटाचा पर्याय लक्षात घेता या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार २३ एप्रिल रोजी पूरवणी सरमिसळ प्रक्रीयेद्वोर आवश्यक बॅलेट युनिट वितरीत करण्यात आले आहेत. सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत, असे श्रीमती द्विवेदी यांनी सांगितले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.