NDA; बांधकामांवर एनडीएच्या संरक्षण भिंतीपासून 10 मीटर आवारातच अट लागू करण्याची मागणी
दिल्ली, निर्भीड वर्तमान:- एनडीएच्या परिसरातील घरांच्या दुरुस्ती संदर्भातील १०० मीटर अंतराच्या अटीबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री मा. राजनाथ सिंहजी यांची खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भेट घेतली आहे.
संरक्षण मंत्रालयाने २०१७ साली राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) आवारात विमानतळ बांधण्याचे ठरविले आहे. यामुळे प्रबोधिनीच्या आवारातील कोंढवे धावडे,शिवणे, कोपरे, उत्तमनगर,कुडजे, किरकटवाडी आणि खडकवासला येथील नागरीकांना घरांची दुरुस्ती किंवा बांधकामांसाठी संरक्षण विभागाकडून ( एअर फोर्स) ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. परंतु ‘एनडीए’च्या संरक्षण भिंतीपासून १०० मीटर आवारात असलेल्या कामांच्या फाईली ‘एनडीए’ने २०१९ सालापासून पुढे पाठविलेल्याच नाहीत.
परंतु २५ ऑक्टोबर २०१६ च्या परिपत्रकानुसार अंतराची ही अट १० मीटर परिसरातील बांधकामांना लागू होते. सर्वोच्च न्यायालयाने देखील २०१६ चे परिपत्रक मान्य करून १० मीटरची अट वैध असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. तरीही एनडीए मात्र १०० मीटरच्या अटीवर अडून बसलेली आहे.
कोंढवे धावडे, शिवणे, कोपरे, उत्तमनगर, कुडजे, किरकटवाडी, खडकवासला या गावांतील नागरीकांच्या जमीनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी स्थापन होताना अधिगृहित केलेल्या आहेत, ही विशेष नमूद करण्याची बाब असुन या गावातील नागरीकांचा त्याग मोठा आहे. तो लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविलेले २०१६ चे परिपत्रक मान्य करावे आणि १०० मीटरच्या अंतरावरील बांधकामे व दुरुस्तीला परवानगी द्यावी अशी विनंती मा. राजनाथ सिंहजी यांना करण्यात आली आहे.
यासोबतच अहिरे गाव, मोकारवाडी, सोनारवाडी, वांजळेवाडी आणि खाडेवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. या रस्त्यांवरुन प्रवास करताना नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी बिकट होते.
हे सर्व रस्ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ( एनडीए)च्या अखत्यारीत येतात. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी विविध पातळ्यांवर निधी उपलब्ध असताना देखील केवळ काही विशेष परवानग्या नसल्यामुळे हे काम करता येत नाही. मा. राजनाथ सिंहजी यांना हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
याप्रसंगी त्रिंबकअण्णा मोकाशी, विजय गायकवाड, शैलेश चव्हाण आणि खुशाल करंजावणे आदी उपस्थित होते.