Pune Exise : राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाद्वारे ८६ हजार ३५९ किंमतीचा मुद्देमाल जप्त
पुणे, निर्भीड वर्तमान :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाद्वारे जिल्ह्यातील गेल्या चार दिवसात हवेली तालुक्यात डुडुळगाव, वाघोली, शिंदवणे, उंड्री परिसरात अवैध गावठी हातभट्टी दारु निर्मीती, विक्री, तसेच अवैधरित्या मद्य विक्री करणाऱ्यांवर छापे मारुन ८६ हजार ३५९ किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्ह्यात विभागाच्यावतीने अवैध दारु निर्मीती, वाहतुक व विक्रीवर आळा घालण्याच्या दृष्टीने १ ते ४ मे या कालावधीत विशेष मोहिम आखून विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्कामार्फत जिल्ह्यात ढाब्यांवर छापे मारुन ६ वारस व २ बेवारस असे एकुण ८ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या गुन्हयांमध्ये एकुण १० आरोपींना अटक करण्यात आली असून या गुन्हयांत एकूण १६ लि. देशी दारु, ८ लि. विदेशी मद्य, १८ लि. बिअर तसेच गावठी हातभट्टी दारु २६ लिटर व १ हजार ८०० लिटर गावठी हातभट्टी दारु निमिर्तीचे रसायन मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक ए. बी. पाटील, व्ही. एम. माने, जवान ए. आर. थोरात, पी. टी. कदम, एस.एस.पोंधे, एस.सी. भाट व आर.टी. ताराळकर यांनी सहभाग घेतला आहे. यापुढेही अशाच प्रकारे मोहिमा राबवून अवैध दारु व्यवसायावर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक नरेंद्र थोरात यांनी दिली आहे.